आमचे अन्नपूर्णा, कैलास दादा...

कृतज्ञता कैलास दादांची 

 आमचे अन्नपूर्णा, कैलास दादा...

सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : कोरोनामुळे कॅन्टिन बंदच आहे... आमच्यासारख्या पहाटे ऑफिसला येणा-यांना रोज नाश्ता, दुपारचं जेवणं कॅरी करणं जमतंच असं नाही. ज्या दिवशी डबा आणत नाही त्या दिवशी आम्हाला आठवण येते कैलास दादांची... सकाळी बरोब्बर साडेआठला कैलासदादा माझ्या पीसी शेजारी हसतमुख चेह-यानं उभे राहतात. कागद पेन घेऊन 'हं, काय आणायचं तुमच्यासाठी?' असा ठरलेला प्रश्न... काहीही असो दादांच्या चेह-यावरचं हास्य कधीच कमी झालेलं दिसत नाही. माझी त्यावेळी फेसबुक लाईव्हची गडबड सुरु असते त्यातही कैलास दादांसोबत बोलणं होतंच. मी शक्यतो नाश्ता, जेवण घरुनच आणते. पण तरी दादा मला विचारतात तुमच्यासाठी काही आणायचंय का... माझं ठरलेलं उत्तर असतं 'ते खालचं सराफ दुकान आहे बघा, ते घेऊन या माझ्यासाठी...'दादाही हसत 'हो आणतो' म्हणतात... मग प्रत्येकाजवळ जायचं नाश्ता काय हवा लिहून घ्यायचं आणि निधी गोळा करत खाली जायचं. बरं हे काम दहा मिनिटाचं या दहा मिनिटांत कैलासदादांचा हजरजबाबीपणा आणि जोक्स ऐकण्याची मजाच वेगळी.

तर आज अचानक कैलास दादांची आठवण का आली ते आता सांगते. कैलास दादांना काविळ झाली आणि 15-20 दिवस ते ऑफिसला आले नाही. मग ऑफिसमधलंच कुणीतरी वेळातवेळ काढून खाली जायचे किंवा घरुनच नाश्ता आणायचे. सगळ्यांनाच कैलास दादांची आठवण येत होती. आज कैलास दादा आलेले दिसले आणि आम्ही सगळ्यांनीच टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या चेह-यावर नेहमीचा हसरा भाव दिसला. पण आजारपणाचा थोडा थकवाही जाणवला.

आजारी आहेत म्हणून त्यांना मागच्याच आठवड्यात फोन केला. आराम करा, पूर्ण बरं वाटल्यावरच ऑफिसला या म्हटलं. तर त्यांचं वाक्य ऐकून मन भरुन आलं. 'नाही ओ मॅडम घरात कमावणारा एकच असला की असं सुट्ट्या नाही ना जमणार... पगार कट झाला तर कसं घर चालवू...?' उगाच त्यांची समजूत घातली. पण नंतर कितीतरी वेळ त्यांचं वाक्य मनात होतं. असे कैलासदादा एकटे नाहीत... आपल्या आसपास हसतमुख चेह-याचे अनेक लोक असतात त्यांच्या जबाबदा-या, त्यांचं दु:ख सहन करत चेहरा हसरा ठेवतात. म्हणूनच कैलासदादांसारखे असे सगळेजण मला आदर्शवत वाटतात. मी गेली साडेबारा वर्ष कैलास दादांना बघते. शनिवार, रविवार जरा कमीच लोक ऑफिसमध्ये असतात मग अशा वेळी कैलासदादांना थोडा निवांत वेळ मिळाला की थोड्याफार गप्पा होतात, अशावेळी कैलास दादांची विनोदबुद्धीही नवख्यांना माहित पडते.

कैलास दादा रजेवर होते तेव्हा त्यांची कामं करण्यासाठी बाकी लोक होतेच. पण तरी त्यांची अनुपस्थिती जाणावायचीच. एका बेलवर साहेबांपुढे हजर होणारे कैलासदादा इतरांच्या मदतीलाही लगेच हजर होतात. त्यामुळेच त्यांचं वेगळेपण उठून दिसतं. ऑफिसमधल्या प्रत्येकाची काही ना काही खासीयत पण प्रत्येकाविषयी लिहिणं शक्य नाही. पण कैलासदादांसारखं नेमकं कुणीतरी मनात घर करुन जातं आणि मग लिहिण्यापासून स्व:तला थांबवणं अशक्य होतं. 

कैलास दादा नसताना पंकज किंवा लोकरे दादाही आमचे अन्नपूर्णा व्हायचे. पण आम्हाला सकाळी साडेआठ वाजले की कैलास दादांची आठवण यायचीच. खरं म्हणजे आम्ही एवढ्या तणावात काम करत असताना कैलास दादा येऊन वातावरण इतकं हलकंफुलंक करायचे की आम्ही कामाचा ताण विसरायचो. त्यामुळे त्यांची आठवण यायची म्हणण्यापेक्षा त्यांच्या हसतमुख चेहरा आठवायचा... त्यांची अनुपस्थिती आम्हाला जाणवायची. म्हणूनच आज कैलास दादा दिसले आणि आम्ही आपसुकच टाळ्या वाजवायला लागलो.

कैलासदादा निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.....