तू 'माठ' आहेस...

झी 24 तासच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांचा ब्लॉग

सुवर्णा धानोरकर | Updated: Apr 3, 2019, 07:11 PM IST
तू 'माठ' आहेस... title=

सुवर्णा धानोरकर : लोअर परळला ऑफिस शिफ्ट झाल्यापासून तू रोज दिसतोस. तू दिसलास की मी काही क्षण घुटमळते. कितीही उशीर झालेला असला तरीही मी एक कटाक्ष तरी तुझ्यावर टाकतेच. तुला नुसतं पाहिलं तरी खूप हायसं वाटतं. आसपास गार गार वाऱ्याची झुळूक सतत जाणवते. सगळं कसं स्वर्ग सुखासारखं वाटतं. तुला आहे का रे याची जाणीव ? तुला माहितीय तुझ्यामुळे किती छान वाटतं ? काळ पुढे गेला, तुझ्या जागी कितीतरी जण आले पण मला मात्र नेहमी तूच आवडलास. आजही हं मला तुच हवा असतो आसपास. पण काही वेळेला ते शक्य नसतं. त्यावेळी माझी चिडचिड होते. तू आसपास नाही म्हटलं की माझी पंचाईतच. माझंच होतं का रे असं, की आणखीही कुणाला असा तुझ्या अनुपस्थितीचा त्रास होतो ? होतच असेल. तू आहेसच असा. माझ्यासारख्या सामान्य, जुन्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला तुझी अनुपस्थिती खटकत असणार. कित्येकांना तू इतकं आपलंस केलं आहेस की ते कशा कशात तुझी रुपं शोधतात. मी पण तसा प्रयत्न केला काही अंशी जमलंही मला. पण खरंच तुला पर्याय नाहीच. तू तूच आहेस.
 
ऑफिसमधून जाताना मी नेहमी तुला बघते.  आधी तिथे तुझ्यासोबत एक आजी असायची. आजी नेहमी डोक्यावरचा पदर सावरत तुझ्या डोक्यावरून हात फिरवताना दिसायची. एखादा नळ लावतानाही सिमेंटचा सपाट लेप द्यायची. तिचे हात हळूवार तुझ्या अंगावरून फिरायचे. त्यावेळी मी तिला आणि तुला मागे वळून वळून पाहायची. आता तिचा नातू दिसतो तिथे. पण आजीची सर नाही त्याला. तो फक्त काम करायचं म्हणून बसलाय असं वाटतं. दुपारी तर तो गाढ झोपतो. आणि तू, तुझी भावंड अख्ख्या दुकानाची राखणदारी करता.  इथली आजुबाजुची दुकानंही नकोशी वाटतात. तू बाजुला असूनही तिथली सगळीच मुलं मुली फ्रँकी खाऊन बाटलीबंद पाणी पितात. त्यांना काय दोष द्यायचा म्हणा. फ्रँकी खाऊन बाटलीबंद पाणीच पिणार ना. असं विचित्र खाणाऱ्यांना तुझी महती कशी कळणार ? 
   
रस्त्यांनी जाताना काही विशिष्ट ठिकाणी तुझं दर्शन घडतं. विशेष:त उन्हाळ्याची चाहूल लागली की तू दिसतोच. गल्लोगल्ली, रस्त्याच्या कडेला, हायवेवर, आणि तुझ्या आवडत्या कुंभारवाड्यांमध्ये. किती तुझी ती रुपं. किती तुझी ती नावं. पण मला एकच नाव आवडतं. माठ. पण तुझ्या या नावाचा गैरवापरही होतो. तुला अशावेळी राग नाही का रे येत?

मुंबईत तर सर्रास तुझ्या नावाचा गैरवापर होताना दिसतो. जरा कुणी कुठल्या कामात गल्लत केली की समोरून 'तू माठ आहेस का?' हे वाक्य कानावर पडतंच. अशा वेळी त्या व्यक्तीला जाब विचारावासा वाटतो. माठंच का ! दुसरं कुठलं नाव नाही का सापडलं ? तुम्ही असं कसं कुणाला माठ म्हणू शकता ! रणरणत्या ऊन्हानं व्याकूळ होता तेव्हा हाच माठ तुमची तृष्णातृप्ती करतो ना ? याच माठातल्या पाण्यानं तोंडाला चव येते ना... मग कुणाला वाईट बोलायच्या वेळी माठ का म्हणता? तो निर्जीव, त्याला बोलता येत नाही म्हणून त्याच्या नावाचा असा वापर कराल? एखाद्या कुंभारानं जर तुमच्यावर खटलाच दाखल केला तर?

एखाद्याचं गुपित कुणी जगजाहीर केलं की माझी मैत्रीण कल्याणी त्याला फुटकं गाडगं म्हणते. 'तू माठ आहेस का !' हे वाक्य जरी आवडत नसलं तरी फुटकं गाडगं हे दोन शब्द कल्लुच्या तोंडुन ऐकले की फारच गोड वाटतात. गाडगं फुटलं तरी कामी येतंच ना. किती सुंदर दिसतो तू. छान गोल गरगरीत आकार, लालचुटुक रंग, लहान मोठ्या आकारातला तू,  नुसतं वर्णन करतानाही मला माठातलं गार पाणी प्यायल्यासारखं वाटतंय. तसा मला तुझा तो  काळा  भाऊ पण आवडतो. त्याच्यावर वाळू लावून पुन्हा काळा लेप दिलेला. तुझे सगळे भाऊबंद मला प्रिय. सुरई, रांजण, मडकं. तुझं पांढरं रुप पण आजकाल दिसायला लागलंय. त्यावर छान नक्षी काढलेली असते. पण हा गोरा साहेब फक्त शोभेसाठी म्हणून कुणा कुणाच्या घरी दिसतो. चिऊकाऊची तहान भागवायलाही तुझी पिल्लावळ कुंभार घडवतो. आतातर मातीच्या बाटल्यापण मिळतात. त्यातलंही पाणी तितकंच गोड.

आज तुझी जागा फ्रिजनं घेतली. पण माझ्या घरी तुझं स्थान अढळ. मी जिथे जिथे गेले तिथे तुलाच प्राधान्य दिलं. मला तू आसपास हवा असतो. त्यासाठी उन्हाळ्याची गरज नाही. अगदी पावसाळा हिवाळा असला तरी मला तूच हवास.  थकून घरी आले की तुझी आठवण येते. तुझं सानिध्य तेव्हा हवं असतं. मला तुझ्या आसपास राहायला आवडतं.

बालपणी सुट्यांमध्ये आजोळी चिमुरला गेले की माझा खेळ रांजणाजवळच रंगायचा. आजीने मोठा रांजण वाळूत रुतवून ठेवलेला. त्याला छान पोतं लपेटलेलं. त्यावर आजी मनापासून पाणी शिंपायची. तिच्या गहुवर्णीय सुरकुतलेल्या हातांनी पाणी शिंपत असताना ती जितकी सुंदर दिसायची तितकाच तूही मोहरून जायचास... तुझं सौंदर्य खुलुन यायचं. तू आणखी गार शांत झाल्यासारखा वाटायचा तेव्हा. आणि तिथे तुझ्या बाजुला खेळताना समोर रणरणतं उन असूनही छान एसीचा फिल यायचा. आता कळतं तो काळ किती छान. आता तर 10 तास एसीच्या गारव्यात बसूनही ती मजा नाही.

वणीला गेले की तिकडे माठांची रांग दिसायची. सर्वात शेवटी स्वयंपाकघर आणि तिथेच दोन -तीन माठ तिवईवर मिरवत असायचे. मी वणीत असायची ती हमखास अक्षय्यतृतियेच्या वेळी. त्यावेळी पुजेसाठी एक मोठा माठ आणि लहान मडकं आणलं जायचं. छान गोल गरगरीत माठ(आमच्या गावाला त्याला कळसा म्हणतात) आणि छोटसं लाल मडकं. पुजा झाली की मला ते खेळायला हवं असायचं. पण मी कधी मागितलं नाही. त्यावेळी तुझ्यापेक्षा जास्त झाडाखाली खेळण्यात मी रमायचे. वणीला आवडती जागा अंगणातली बाग. इकडे कल्याणलाही लंबगोल आकाराचा होतास तू. एक छान स्टिलचा नळ होता तुला. (आता स्टीलची जागा प्लास्टिकच्या तकलादू नळांनी घेतलीय) त्यातून पाणी घ्यायला हात पोहचायचा नाही. मग आईच्या हातून पाणी मिळायचं. नंतर घरात फ्रीज आला. नव्याची नवलाई, मी तुझी साथ सोडली आणि फ्रीजला जवळ केलं. पण त्यातल्या पाण्यानं माझं समाधान होतंच नव्हतं. मग चूक कळली आणि पुन्हा मोर्चा तुझ्याकडे वळला. पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. उलट आतातर मी जिथे जाईन तिथे तुझाच प्रचार करत असते. तू किती चांगला. तुझ्यात किती गुण आहेत. तुझ्यामुळे प्रकृती कशी ठणठणती राहते.  तू कसा पर्यावरणपुरक हेच सांगत असते मी. 
  
कल्याणला असताना शाळेतून घरी जाताना लालन दुकानापासून पन्नासएक मीटरवर लोणच्याच दुकान होतं तिथे तर मोठमोठाले रांजण होते. लाल कापड गुंडाळलेले ते रांजण. आजही आहे का ती पाणपोई ? तिथे तर आमच्या शाळेतल्या मुलामुलींची झुंबड उडायची. सगळ्यांना त्या रांजणातलं पाणी प्यायची इच्छा असायची. काय गोडवा होता त्या पाण्यात ! बहुदा म्हणूनच तिथे गर्दी व्हायची. काही खरेखुरे तहानलेलेही तिथे यायचे आणि तुझ्यातलं पाणी घोटघोट पित तृप्त व्हायचे. चंद्रपूरला गेल्यावरही घरात तुझं स्थान अटळ होतं. जागा बदलायची पण तूझी साथ कायम.   

हैद्राबादला गेल्यावर तिथेही तुच होतास. संप्रदाला तू आवडशील का असा कधी विचार मनात आलाच नाही. कारण तू तिलाही आवडणारच याची खात्री होती. हैद्राबादमध्येही घराजवळच्या बाजारात तुझी कितीतरी रुपं बघायला मिळायची. तिथल्या कडक उन्हात तू जास्तच जवळचा वाटायचास. तिथल्या उन्हाळ्यात क्षुधाशांतीसाठी लहान मडक्यात आम्ही दही जमवायचो. मग दोघीही मजेत ते दही खायचो. माठातलं लोणचं मात्र करायचं राहिलचं. करेन कधीतरी.

मुंबईत आल्यावरही तुझी साथ मी सोडली नाही. इथे आल्यावर एक दिवस ऑफिसमधून भर उन्हात तुला घरी घेऊन आले. तुझा वापर करतानाही एक विशिष्ट पद्धत असते, म्हणून तुझ्यात पाणी भरायला सुरुवात केली. तहान भागवणारा तू त्या क्षणी तहानलेला दिसलास. तुझं आणि पाण्याचं नातं किती घट्ट आहे हे दिसलं. मी ओंजळ-ओंजळ पाणी तुला देत होते आणि तू प्रत्येक ओंजळीगणिक तृप्त होत होतातस. पाण्याच्या स्पर्शानं तू कसा मोहरून गेलास ते मी मन लावून पाहात होते. तुला सतत स्पर्श करत होते. तुझ्या थंडगार स्पर्शानं मीही शांत होत होते.  भरपूर पाणी प्यायल्यावर तुझं पोट भरलं आणि मग मी, तुला कुठे ठेऊ, तुझ्यासाठी योग्य जागा कुठली असा विचार करायला लागले. अखेर योग्य जागा सापडली. तिथे तु ऐटीत विराजमान झालास. आता तुला अजिबात इकडे तिकडे करणार नाही.
 
येडशीला तर तू भल्यामोठ्या आकाराचा एकटा. मोठ्या तिवईवर अविरत झटत असतोस. घरातल्या सगळ्यांची, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तहान भागवतोे. गावातलं छानं जुनं पारंपरिक घर आणि त्याच घरात तू अगदी शोभून दिसतोस. मी सासरी असली तरी मला सासरी असल्यासारखं कधीच वाटतं नाही. सासरच्या मंडळींसोबतच तुझ्याकडून मला माहेरचं सुख मिळतं. माहेरचा गारवा, गोडवा तू मला देतोस. तुझ्यातलं पाणी प्यायले की मन तृप्त होतं.  

इकडे मुंबईत घराजवळच्या नर्सरीत लाकडी पाट्यांवर तू मस्त पहुडलेला दिसतोस रोज. रस्त्यावरून येवढ्या गाड्या जात असतात. कर्कश हॉर्न आणि उन्हाच्या झळा. पण तू निवांत. जणू तू त्या जगातला नाहीसच. तुझ्या आसपास झाडंही छान मजेत डौलत असतात. त्यानांही तुझी संगत आवडते. कधी तू दिसतोस घराजवळ एखाद्या हातगाडीवर. कुणीतरी तुझा भाव करत असतं. एकदा भाव ठरला की मग तुझ्या भावंडांमधून एकाची निवड केली जाते. मग गाडीवाला छान ती अंगठी तुझ्या मोठ्या पोटावर वाजवतो आणि उगाच,  'ये अच्छा है भाभी ये वाला लो' म्हणून सांगतो. मग भाभी खूश होऊन तुला घरी घेऊन जाते. मनोमन खूश. आता मुलांना खेळून आल्यावर यातलं गारेगार पाणी प्यायला मिळणार हा आनंद तिच्या चेहऱ्यावर  झळकत असतो. आता तू हातगाडीवर सर्रास दिसत असलास तरी अधुनमधून एखाद्या भैय्याच्या डोक्यावर मोठ्या टोपल्यात असतोस.  केशरी रंगाची जाळी किंवा नायलॉनच्या केशरी दोरीनं विशिष्ट पद्धतीनं तुला टोपल्यात बांधून ठेवतो भैय्या. माझ्या लहानपणी तू नेहमी असा भैय्याच्या डोक्यावरूनच फिरताना दिसलास.

आई झाल्यावर वाटायचं आपली माठ्यातल्या पाण्याची आवड मुलातही येईल का? जेव्हा त्याला चंद्रपूरमध्ये माठतलं पाणी मनसोक्त पिताना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मन भरुन आलं. तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान आणखी पक्क झालं म्हणून आनंदून गेले. आता तर मुलाला तुझ्याशी खेळायला आवडतं. येता जाता घोट घोट पाण्यासाठी तुझ्या आसपास घुटमळत असतो. तुझ्यातलं पाणी प्यायला त्याला आवडतं. तुझ्या पाण्यानं तोंडाला चव येते म्हणतो. मी हे सांगायची गरज नाही. तुही असतोस ना त्याच्या सानिध्यात. त्याच्या इवल्याशा हातांचा स्पर्श तुलाही सुखावून जातच असेल ना. जसा तु तापलेल्या डोक्याला शांत करतोस तसं तुलाही अशा इवल्याशा हातांनी शांत झाल्यासारखं वाटत असेल.

गेल्यावर्षी 'चविष्ट उन्हाळा' कार्यक्रम केला. त्यासाठी जे लोकेशन होतं. त्या घरात पाय ठेवताक्षणी छान इंटेरियर केलेलं दिसलं. पण त्यावरून नजर फिरत असतानाच अचानक तू दिसलास आणि माझीच नाही तर सगळ्या कॅमेरामेनचीही नजर तुझ्यावर स्थिरावली. फ्रेममध्ये तू हवासच असा माझा अट्टाहास, आणि खरंच तुझ्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची शान वाढली. शूट संपेपर्यंत भूक लागली होती. पण दरम्यानच्या काळात तुझ्यातलं पाणी पोटात रिचवत होते आणि भूक शांत होत होती.  

तू आम्हाला गारेगार पाणी द्यावसं म्हणून तुला कुठल्या दिव्यातून जावं लागतं. पण त्यासाठी तू कधी कटकट करत नाहीस. कधी रागावतही नाही. चाकावर गरगर फिरुन चक्कर येत असतानाच तुला ओलेत्या अंगानं उन्हात थांबाव लागतं.  भट्टीतल्या ज्वाळा तुला अंगावर झेलाव्या लागतात. पण तरीही तोंडून ब्रही काढत नाहीस. सगळं सहन करून पुन्हा आम्ही तुला घ्यावं म्हणून उन्हातान्हात मोठमोठ्या रस्त्यांवर वाट बघत असतोस. तुझे मालक कसे तुला एकावर एक विशिष्ट पद्धतीनं रचून ठेवतात. किती छान वाटतं. तुझ्या कुटुंबाचं ते एकत्रित रुप बघताना. बाजुलाच तुझा बाप रांजण, ऐटीत गिऱ्हाईकांची वाट पाहत असतो, आणि तुझी सडपातळ बांध्याची आई सुरई, ती तर सगळ्यांच्या सरबराईत गुंतलेली असते. तिच्यातल्या पाण्यातही किती ममता. तिच्या त्या नक्षीदार हातांमधून पाणी पेल्यात पडतं तेव्हा ते पाहतच राहावंस वाटतं.

तू फुटलास तरी काही हरकत नसते कुणाची तुझा वापर तरीही करता येतो. तुझे लहानलहान तुकडे झाडासाठी कुंडीत ठेवतात. एखादा मोठा तुकडा असेल तर त्यावर खुसखुशीत पुरणपोळीही करतात. खापरपोळी आहेच.

तुझी जागा आता आरओ फिल्टर घेतंय. हे पाहून मन खट्टू होतं. त्यातलं पाणी शुद्ध म्हणून त्याची जाहिरातबाजी केली जाते. पण तुझी सर नाहीच त्याला. तुझ्यातलं पाणी घेताना तुझा तो खरपूस स्पर्श इतका सुखावतो मनाला की त्याचं वर्णनही करता येणार नाही. तो ज्याचा त्याने अनुभवावा.

  
जग बदललंय खूप. पण तु नको हं बदलू. तुझं समाजकार्य असंच सुरु राहू दे अविरत. तुझ्यामुळं कुंभाराचं घर चालतं. त्याच्या पोटाला भाकरतुकडा मिळतो. तुझी मागणी अविरत वाढू दे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर तुझी साथ सगळ्यांना लाभो. तू प्रत्येकाच्या घरात विसावू दे. एखाद्या हायवेवर पाणपोईत तू दिसू दे.

काळ कितीही बदलला तरी तू तसाच. तुझ्यातले गुण किंचितही कमी होऊ दिले नाहीस. बाहेर म्हणे ग्लोबल वॉर्मिंगनं तापमानात वाढ होत चाललीय. पण त्यातही तुझ्यातला गारवा, गोडवा, तुझा प्रेमळ स्पर्श तू तसाच जपलास. आमचे लाड केलेस. तहानेनं व्याकुळ झालेला काय किंवा एखादा संतापानं लाहीलाही झालेला काय साऱ्यानाच एका घोटात शांत करतोस. येवढंच कशाला तू तर आमच्या शेवटालाही सोबत करतोस. तरी काही लोक तुला ऑल्ड फॅशन म्हणून हिणवतात. यात दिलासा इतकाच की मुंबईसारख्या शहरात तुझं अजुनही दर्शन घडतं. अविरत सोबत राहा. तृष्णातृप्ती करत. तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीतून तमाम लहानग्यांवर चातुर्याचे संस्कार करत. कारण काहीही झालं तरी तू 'माठ' आहेस.