close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आवरा वेगाला, सावरा जीवाला; अनियंत्रित वेगाचे १३ बळी

 औरंगाबाद येथून शहाद्याकडे येणारी एस टी महामंडळाची बस आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. कंटेनरने बसला

Updated: Aug 19, 2019, 07:57 PM IST
आवरा वेगाला, सावरा जीवाला; अनियंत्रित वेगाचे १३ बळी

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रविवार नेहमीप्रमाणे उजळला मात्र मावळला १३ जणांचे जीव घेऊन. औरंगाबाद येथून शहाद्याकडे येणारी एस टी महामंडळाची बस आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. कंटेनरने बसला अशी काही धडक दिली की, बस अर्ध्याहून अधिक फाटली. बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. १३ जण या अपघातात मारले गेले तर ३६ जण जखमी झाले. रविवारची रात्र संपणार त्याआधी काळाने घाला घातला. 

धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावाजवळ झालेला अपघात सर्वांच्या जीवनाला चटका देऊन गेला. हा अपघात इतका भयावह होता की अनेकांचा थरकाप उडवून गेला. वाहन चालवताना वेगाला लगाम घालता आली नाही, तर किती भीषण परिमाण समोर येतात, याचा धक्कादायक परिपाठ हा अपघात देऊन गेला.

कारण या अपघाताने एक दोन नव्हे, तर तब्बल १३ जणांचे प्राण घेतले. वेग आवरला गेला नाही आणि तब्बल १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले, १३ कुटुंब उघड्यावर पडली. 

श्रावणातील तिसरा सोमवार शहादा शहरासाठी काळा दिवस म्हणून उगवला. शहरातील स्मशान भूमीत एकाच वेळी अनेकांच्या चिताना मुखांग्नी दिला गेला. या चिता धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावाजवळ झालेल्या भीषण अपघाताची साक्ष देत आहेत. 

या अपघातात कोणी आई गमावली, तर कोणी भाऊ, तर कोणी आपला मुलगा गमावला. विशेष म्हणजे या अपघातात मरण पावलेल्या एसटी बसमधील प्रवाशांची काहीही चूक नसताना त्यांचा आपल्या जीवाशी मुकावे लागले. शत्रुलाही मिळू नये, असे दुःख हा अपघात अनेक कुटुंबाना देऊन गेला. स्मशान भूमीतील या टाहोला कारण ठरलं आहे, "वेग". 

वेगावर नियंत्रण न राहिल्याने शहाद्याकडून दोंडाईचाकडे जाणाऱ्या कंटेनरने औरंगाबाद - शहादा बसला अशी काही धडक दिली की, ही बस अर्धी कापली गेली.  ११ प्रवाशांना आपला जीव तर गमवावा लागला, सोबत एसटी बसचा चालक आणि कंटेनरच्या चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला. हा कंटेनर काळ बनून आला होता, मात्र हा काळ अनियंत्रित वेगाने ओढून आणला.     

बेभानपणे गाडी चालवल्यामुळेच या अपघाताची ही भीषणता वाढली. वाहतूक नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचेही प्रथमदर्शनी दिसून आले. चालकांची मस्ती आणि बेपर्वाही अनेकांचा संसार उघडा करून गेली. 

वाहतुकीचे नियम कठोर होत आहेत, चालकांना दंडरुपी शिक्षा वाढवली गेली, मात्र या कायद्यांची अंबलबजावणी केव्हा आणि कोण करणार आहे ? हा प्रश्न या अपघातानंतरही अनुत्तरित आहे. 

बेदरकारपणे वाहन चालवून या अपघातातील चालकाने आपला जीव तर गमावलाच सोबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाना आयुष्यभराचा चटकाही दिला. अशा बेपरवा चालकांवर कठोर कारवाईची मागणी, आता या अपघातानंतर केली जात आहे.  

गेल्या पाच वर्षात मुकटी, चिंचगव्हाण फाटा आणि आता निमगूळ गावाजवळ असे एकूण ३ मोठे अपघात जिल्ह्यात झाले आहेत. या तीन अपघातात ४९ जणांनी जीव गमवावे लागले. हे तीनही अपघात वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्यामुळे झाले. त्यामुळे वाहन चालवताना आवरा वेगाला, सावरा जीवाला, हे ब्रीद वारंवार सांगण्याची वेळी आहे. आपल्या फोटोला माळा लटकण्याआधी वाहन चालकांनी या अपघातातील भीषणता कधीही विसरू नये.