मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फेक व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं, तब्बल 12 हँडल्सविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अर्धवट वक्तव्याचा फेक व्हीडिओ व्हायरल करण्यात आला. मात्र हा प्रकार फेक व्हीडिओ व्हायरल करणा-यांना चांगलाच महागात पडला आहे

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2024, 09:15 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फेक व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं, तब्बल 12 हँडल्सविरोधात गुन्हा दाखल title=

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अर्धवट वक्तव्याचा फेक व्हीडिओ व्हायरल करण्यात आला. मात्र हा प्रकार फेक व्हीडिओ व्हायरल करणा-यांना चांगलाच महागात पडला आहे. यासंदर्भात भाजपनं सायबर सेलकडे तक्रार केली आहे. त्या आधारे गुन्हा नोंदवत, व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरवणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पाहुयात, याविषयीचा हा रिपोर्ट.

सायबर गुन्हेगारी वाढलेली असताना फेक व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत अपप्रचाराचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला फेक व्हीडिओ व्हायरल करण्यात आला. थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यासोबत छेडछाड करून अर्धवट फेक व्हीडिओ व्हायरल करण्यात आला.  याप्रकरणी गुन्हा नोंदवत तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने अधिक तपास सुरू आहे. फडणवीस यांच्या भाषणातील नेमके संवाद बाजूला काढून त्याआधारे हा खोटा व्हिडिओ तयार करण्यात आला असल्याचं सायबर पोलिसांचं म्हणणं आहे. फडणवीसांचा फेक व्हीडिओ व्हायरल करणा-या  सोशल मीडियावरील 12 हॅडल्सविरोधात महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा नोंदवलाय.

- भारत शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल
- सौरभ सिंह चौहान, मुकेश लवाळे, सुरेश काळे,
- प्रसाद साळवी, वरद कांकी, अमोल कांबळे,
- सैयद सलीम, द स्मार्ट २३०के, विष्णू भोटकर या हँडलविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलारांनी यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. शहरी नक्षलवाद प्रतिबंध कायदा यासाठीच आवश्यक असल्याचंही शेलार यांनी म्हटलं आहे. 

वाढती सायबर गुन्हेगारी ही अत्यंत चिंतेचा विषय बनत चालला आहे. फसवणूक, बदनामी यांसारख्या प्रकारामुळे अनेकांना गंडवलं -जातंय. थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फेक व्हीडिओ तयार करून तो व्हायरल करण्यापर्यंत सायबर भामट्यांची मजल गेली आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलणं गरजेचं आहे.