Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अत्यंत दुर्देवी आणि चिंता वाटावी असा हा आजचा प्रकार आहे. एसटी संपाच्या बाबतीत सरकारने मार्ग काढण्यासाठी, मागण्या मान्य करण्यासाठी सर्व उपयायोजना आणि चर्चा केलेल्या आहेत.
न्यायालयाचा जो निर्णय आहे तो सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. सर्व मागण्या मान्य झाल्याची माझी माहिती आहे. तरीही कुठली तरी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन, माथी भडकाऊन जी कृत्य केली आहेत अशी कृत्य घडावीत यासाठी सातत्याने हालचाली सुरु आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार काही जणांच्या डोळ्यात खुपतंय, त्यांच्या पोटात दुखतंय, असे काही लोक ही कृत्य घडवू पाहतायत, शरद पवार हे संसदीय लोकशाही माननारे नेते आहेत. आंदोलनं, निदर्शनं, मोर्चे हा जनतेचा हक्क आहे असं माननारे ते नेते आहेत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा याच भूमिकेचे नेते होते.
पण ज्या पद्धतीचं आजचं आंदोलन होतं, ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे निर्भयपणे तिथे गेल्या. त्या आंदोलकांशी चर्चा करत होत्या, त्यांना हात जोडून त्या विनंती करत होत्या तरीही समोरुन ज्या प्रकारचं वर्तन सुरु होतं. हे लोकशाहीच्या आंदोलनाला शोभणारं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.