मुंबई : अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीये.. तसा आदेश शिक्षण विभागानं जारी केलाय.. खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण विभागानं हे पाऊल उचललंय. ही योजना यंदा मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद, नागपूर या विभागातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री महिनाभरात गोळा करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
तसंच अंमलबजावणीचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी सरकारला सादर करायचा आहे.. इतकच नाही तर महाविद्यालयांना अचानक भेट देऊन हजेरीचा आढावाही घ्यायचा आहे.. बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.. विज्ञान शाखेचे विद्यार्थी क्लासेसमध्ये जाण्यासाठी नियमित वर्गांना गैरहजर रहातात आणि केवळ प्रात्यक्षिकांना हजर रहातात.
काही महाविद्यालयांनी तर क्लासेसशी करार केल्याची प्रकरणंही उजेडात आलीत. त्यामुळे शासनानं बायोमेट्रीक हजेरीचा निर्णय घेतलाय.. या निर्णयामुळे कॉलेज बंक करण्यास चाप बसेल आणि महाविद्यालयांशी हातमिळवणी करुन इंडिग्रेटेड क्लासेस चालवणाऱ्यांना वेसण घातली जाणार आहे.