मुंबई : राजस्थानच्या एका व्यक्तीनं बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यावर फसवणुकीचा आरोप केलाय. या व्यक्तीनं मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये किम शर्माविरुद्ध एफआयआर नोंदवलीय.
आपली करोडोंची कार किमनं आपल्या ताब्यात ठेवल्याचं या व्यक्तीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. ही कार या व्यक्तीनं किमपासून वेगळा झालेल्या तिच्या पतीकडे सोपवली होती.
राजस्थानच्या या व्यक्तीचं नाव दिलीप कुमार आहे. आपल्या रेंज रोवर या करोडोंच्या कार कीमनं जबरदस्तीनं आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप या व्यक्तीनं केलाय. शाहरुख खानच्या 'मोहब्बते' या सिनेमात दिसलेली किम पती अली पुंजानी याच्यापासून वेगळी राहत आहे.
एनआरआय व्यावसायिक असलेल्या दिलीप कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ते परदेशात व्यावसाय करत आङेत. त्यामुळे ते अनेकदा परदेशातच असतात आणि कधीतरी ते मुंबईत येतात. यामुळे आपली महागडी कार त्यांनी किमचा पती अली पुंजानी यांच्या खार स्थित घराच्या आवारात पार्क केली होती. जेव्हा कधी ते मुंबईत येत... हॉटेलमध्ये राहत ते आपल्या गाडीचा उपयोग करत.
आपल्या गाडीचा ताबा आता किमनं घेतलाय. ती ही कार वापरते, असं समजल्यानंतर त्यांनी आपली कार परत मागितली. परंतु, किमनं मात्र ही कार परत करण्यास त्यांना नकार दिला.
त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये दिलीप कुमार यांनी पोलीस स्टेशनमध्ये किमविरुद्ध तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी किमवर तक्रार दाखल करण्याऐवजी तिचा पती अली पुंजानी यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ४०६ अंतर्गत प्रकरण दाखल केलं.
चुकीच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजल्यानंतर दिलीप कुमार यांनी किमविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार मराठीत दाखल झाल्यानं आपल्याला चुकीच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंद झाल्याचं लक्षात आलं नाही, असं दिलीप कुमार यांनी म्हटलं.
दरम्यान, यावर किम शर्माची प्रतिक्रिया नोंदवताना 'मिड-डे'नं पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार, 'ही कार आपल्याला पती पुंजानीनं दिलीय मग ती मी दिलीप कुमार यांना का देऊ?' असा उलट प्रश्न किम शर्मानं विचारल्याचं म्हटलंय.