'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही टॉप पाचमध्ये पाहायला मिळते. या मालिकेत झळकणाऱ्या प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतंच वडिलांबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
मिलिंद गवळी हे इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. मिलिंद गवळी हे सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. ते त्यांच्या खासगी आयुष्यासह करिअरबद्दलही माहिती देताना दिसतात. नुकतंच मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते सेटवरील कलाकारांबरोबर नाचताना, मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका अनुभवाबद्दल सांगितले आहे.
आयुष्य सुंदर आहे, आपण भाग्यवान आहोत, आज सकाळी आपण झोपेतून उठू शकलो, ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे, कारण कारण जगामध्ये असे लाखो लोक आहेत ज्यांनी आजची सकाळ पाहिली नसेल. खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण आज युक्रेन किंवा गाजा स्ट्रिप मध्ये राहत नाही आहोत. आपण भाग्यवान आहोत की आपण हिटलरच्या काळामध्ये ज्यूस म्हणून जर्मनीमध्ये जन्माला नाही आलो. मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी भारतामध्ये इतक्या सुंदर देशांमध्ये जन्माला आलो. मी नाही आलो जन्माला सोमालिया, बुरंडी ,सुदाम अशा देशांमध्ये जिथे कुपोषित मुलांची संख्या अतिशय जास्त आहे, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले.
अनिरुद्ध देशमुखसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम
त्यापुढे ते म्हणाले, "मी भाग्यवान आहे की इतक्या सुंदर आई-वडिलांच्या पोटी मी जन्माला आलो. ज्यांनी माझं खूप छान पद्धतीने संगोपन केलं. मला चांगलं शिक्षण दिलं. स्वतः कष्ट करून माझा आयुष्य सुखमय करायचा प्रयत्न केला. आयुष्याकडे बघायचा सकारात्मक आणि छान पद्धतीचा दृष्टिकोन त्यांनी मला दिला. मी भाग्यवान आहे की मला माझ्या आवडीचं काम मिळालं आणि त्या कामांमध्ये मला यशही मिळालं. मी भाग्यवान आहे की मला सुदृढ शरीर आणि जिद्दी मन मिळालं. आजही कष्ट करायची ताकत दिली. Gratitude आज बाराशे हुन अधिक episodes “आई कुठे काय करते” या मालिकेचे मला मिळाले आणि अजून ही छान पद्धतीने करायला मिळत आहेत.
उत्कृष्ठ लेखन दिग्दर्शन निर्मिती तंत्रज्ञ आणि अफलातून सहकलाकारांबरोबर काम करायला मिळतं आहे. स्टार प्रवाह , हॉट स्टार सारखी उत्कृष्ट वाहिनी या वर ते प्रदर्शित होत आहे. या चार वर्षांमध्ये अनिरुद्ध देशमुख या माझ्या भूमिकेसाठी लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं आहे. खरंच भाग्यवान आहे मी..."
वडिलांकडून मिळाली अशी पावती
"काल मी माझ्या वडिलांबरोबर एका ठिकाणी गेलो असताना काही लोक धावत माझ्याजवळ आले माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी, त्यानंतर माझे वडील मला म्हणाले “माझ्या सारखा पोलीस खात्यात आला असतास आणि डीसीपी म्हणून किंवा कमिशनर म्हणून जरी रिटायर झाला असतास, तरी इतकी लोकप्रियता, प्रसिद्धी आणि लोकांचं इतकं प्रेम मिळालं नसतं. मी भाग्यवान आहे की मला माझ्या वडिलांकडनं ही अशी पावती मिळाली", असे मिलिंद गवळी यांनी म्हटले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेचा 1200 वा भाग प्रसारित करण्यात आला. सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत सध्या यशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी यश आणि आरोही या दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता देशमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता पुढे मालिकेत काय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.