Milind Gawli Social Media Post : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवी घडामोड घडताना दिसत आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींच्या नवनव्या खेळींमुळं महत्त्वाच्या मुद्द्यांकडे बऱ्याचदा प्रशासन आणि माध्यमांचंही दुर्लक्ष होताना दिसत आहे. हीच वस्तुस्थिती असताना परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे असा सूर नागरिकांनी आळवल्याचं तुम्हीआम्ही पाहिलं, पण त्यामुळं खरंच फरक पडला? राजकारणामुळं सुरु असणारे आरोप प्रत्यारोप आणि शासनाचा ढिसाळ कारभार, राज्यातील शेतकरी, नागरिक आणि कलाकारांचे अनुत्तरित प्रश्न या साऱ्याबाबत आता अखेर कलाकारांनीच व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे.
मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता मिलिंद गवळी यानं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आणि त्यानं थेट मंत्र्यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अतिशय समर्पक पोस्ट लिहित मिलिंदनं काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी शेतकरी आणि कलाकार या दोन महत्त्वाच्या वर्गांवर त्यानं प्रकाश टाकला.
शेतकरी आणि कलाकारांमध्ये नेमकं साम्य काय? असा प्रश्न विचारतच त्यानं पोस्टची सुरुवात केली आणि या प्रश्नाचं उत्तरही स्वत:च दिलं. कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसताना ही मंडळी ज्या जिद्दीनं आपआपल्या क्षेत्रात योगदान देतात याबद्दल त्यानं कौतुकही केलं. पण, तिथं पिकाला बाजारभाव न मिळाल्यामुळं हतबल झालेला शेतकरी आणि कलाकृतीला कोणी विकत घ्यायला तयार नसल्यामुळं अपयशी ठरलेला कलाकार त्याला लपवता आला नाही. अतिशय दाहक वास्तव मांडत मिलिंदनं ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.
परिस्थिती इतकी वाईट होण्यामागे आणि समाजातील दोन महत्त्वाचे घटक दिसेनासेच होण्यामागे नेमकं कारण काय? हे सांगताना मिलिंदनं कृषी आणि सांस्कृतिक मंत्रालय आणि त्यांचा कारभार पाहणाऱ्या मंडळींकडे लक्ष वेधलं. कुणाचंही नाव न घेता त्यानं हा टोला लगावला.
'ज्या माणसाला कृषी विभाग दिला जातो, कृषिमंत्री केलं जातं, कृषी विभागाचे सेक्रेटरी वगैरे असतात, त्यांचा शेतीशी काही संबंध नसतो, ती कधीही शेतात राबलेले नसतात शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्याच त्यांना कळत नाही माहित नसतात, आणि तसंच सांस्कृतिक विभागात तीच परिस्थिती आहे, जर असं केलं तर सांस्कृतिक मंत्री त्यालाच बनवायचं, त्याचा कलेशी संबंध आहे', असं त्यानं लिहिलं. सरतेशेवटी सदरी खात्यांची माहिती असणाऱ्यांना आणि ते खातं चालवायचं कसं याची जाण असणाऱ्यांना त्या पदावर नेमावं असा आग्रही सूर त्यानं आळवला.