Chhapaak trailer : 'छपाक'ची झलक पाहून दीपिकाला अश्रू अनावर

या क्षणांचा मी विचारही केला नव्हता.... 

Updated: Dec 10, 2019, 05:35 PM IST
Chhapaak trailer : 'छपाक'ची झलक पाहून दीपिकाला अश्रू अनावर
दीपिका पदुकोण

मुंबई : अभिनेत्री  Deepika Padukone दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छपाक'  Chhapaak trailer या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. ट्रेलर पाहून सोशल मीडियापासून ते थेट कलावर्तुळापर्यंत प्रत्येकाने दीपिकाच्या अभिनयाची दाद दिली. शिवाय अनेक भावना दाटून आल्याचीही प्रतिक्रिया दिली. 

भावना दाटून येण्याच्या बाबतीत दीपिकाही अपवाद ठरलेली नाही. ट्रेलर सादर केल्यानंतर कार्यक्रमादरम्यान जेव्हा दीपिका व्यासपीठावर आली, तेव्हा माईक हातात घेऊन या ट्रेलरविषयी बोलण्यास सुरुवात करतेवेळीच तिला अश्रू अनावर झाले. अतिशय भारावलेल्या नजरेने चित्रपटाच्या पोस्टरकडे पाहात, 'मी फक्त याच क्षणांचा विचार केला होता की तुम्ही ट्रेलर पाहाल आणि मला इथे यायचं आहे' असं दीपिका म्हणाली. 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

'व्यासपीठावर आल्यानंतर काही बोलावं लागेल याचा विचारच केला नव्हता, मी जेव्हा जेव्हा ट्रेलर पाहते तेव्हा.... ', असं म्हटल्यानंतर दीपिकाचा कंठ दाटून आला. ''असं वारंवार होत नाही जेव्हा तुमच्याकडे एखादं कथानक येतं ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेचा भाग व्हावं लागतं. सहसा या प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर चित्रपट साकारायचा आहे की नाही याबाबतचा निर्णय घेतला जातो. असं खूप कमी वेळा होतं जेव्हा दिग्दर्शकांसोबतच्या भेटीतील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच तुम्ही त्या चित्रपटाची निवड करता. 'छपाक', माझ्यासाठी तसाच एक चित्रपट आहे'', असं म्हणत दीपिकाने तिच्या भावना शब्दांवाटे व्यक्त केल्या. 

ट्रेलर लाँच कार्यक्रमाच्या वेळी आपल्यावर विश्वास ठेवत 'छपाक'ची संधी दिल्याबद्दल तिने मेघना गुलजार यांचे आभरही मानले. शिवाय या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जो संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे तो नक्कीच अतिशय प्रभावीपणे पोहोचेल अशी आशाही व्यक्त केली.