Pulwama Attack : देशभक्तीची शिकवण देणाऱ्या मल्लिकाला नेटकऱ्यांनी झोडपलं

'देश दु:खात असताना तू हसतेस कशी' म्हणणाऱ्यांनो....

Updated: Feb 18, 2019, 02:37 PM IST
Pulwama Attack : देशभक्तीची शिकवण देणाऱ्या मल्लिकाला नेटकऱ्यांनी झोडपलं title=

मुंबई : १४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीर येथील पुलवामा भागात झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप आणि दु:ख व्यक्त केलं. शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याच्या प्रतिज्ञा अनेकांनी घेतल्या. शक्य त्या मार्गाने प्रत्येकजण व्यक्त होत होता. मग ते सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून असो किंवा कोणाशी संवाद साधताना असो. पण, अभिनेत्री मल्लिका दुआने मात्र अशा मंडळींवर आगपाखड केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या केल्या जाणाऱ्या पोस्ट वगैरे पाहता 'ही मंडळी नेमकं काय सिद्ध करु इच्छितात?', आम्ही अशा पद्धतीची कोणतीच पोस्ट केली नाही याचा अर्थ असा नाही की आम्हाला परिस्थितीचं गांभीर्य नाही हे तिने स्पष्ट केलं. 

देशात रोज अनेकांचा भूकबळी जातो, नैराश्याने काहीजण त्यांचा जीव गमावतात, त्यांच्या प्राणांची काही किंमत नाही का? असा प्रश्न तिने फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हिहिओतून मांडला आहे. परिस्थिती काहीही असो आयुष्याचा गाडा हा पुढे जातच राहणार याकडे तिने व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधलं. सर्वत्र शहीदांच्या बलिदानाचा शोक व्यक्त केला जात असताना जो वर्ग या प्रकरणात व्यक्क होत नाही त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्यांना सुनवत आम्हीच नव्हे तर नेतेमंडळीही नेहमीप्रमाणेच त्यांचं आयुष्य जगत आहेत. मग यात अडचण काय, असं वक्तव्य केलं. 

'तुम्ही जास्त भारतीय आणि आम्ही कमी...' हे असंच सध्या सुरू आहे. असं म्हणत आपला दृष्टीकोन तिने मांडला खरा. पण, नेटकऱ्यांना तिचं हे म्हणणं मात्रं पटलेलं नाही. सोशल मीडियावरुन अंदाज बांधणं बंद करा, असं ठामपणे म्हणणाऱ्या मल्लिकाला नेटकऱ्यांनी झोडपलं. 'ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तू प्रसिद्धिझोतात आलीस त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून, तू हे असे विचार मांडत आहेस..', असं म्हणत मल्लिकाचा विरोध करण्यात येत आहे. जवानांच्या बलिदानाची नैराश्य आणि भूकबळींशी तुलना करणाऱ्या मलिक्काचा धिक्कार असो, कारण तिने एका अर्थी सैन्यदलांचा आणि देशाचा अपमान केला आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या तिच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्यमध्ये पाहायला मिळत आहेत.