मुंबई : अभिनेत्री नयनतारा हिच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणं ज्येष्ठ अभिनेते राधा रवी यांना महागात पडल्याचं कळत आहे. नयनताराविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना द्रमुकतून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनीच याविषयीची माहिती देणारं एक पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केलं होतं. आपला पक्ष महिलांच्या हक्कांचं समर्थन करत असून अभिनेत्रींसाठीचं रवी यांचं वक्तव्य हे पूर्णपणे आक्षेपार्ह आणि निंदास्पद असल्याचं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं. खुद्द नयनतारानेही एक पत्रक प्रसिद्ध करत, त्या माध्यमातून तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
शनिवारी नयनताराच्या आगामी 'कोलायुथिर कालम' या तमिळ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी रवी यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचाच तिने समाचार घेतला.
#Radharavi on stage#KolaiyuthirKaalam Trailer launch #Nayanthara#KolaiyuthirKaalam #KolaiyuthirKaalamTrailer @EtceteraEntert1 @DoneChannel1 @rajshriofficial @thisisysr pic.twitter.com/u21PLfkuFN
— Thiyagu PRO (@PROThiyagu) March 23, 2019
'मी जाहीरपणे कोणा एका गोष्टीवर बोलणं टाळते. पण, मी ज्या क्षेत्रात काम करते ते क्षेत्र मला याविषयी बोलण्याची मुभा देतं', असं म्हणत तिने पत्रकाच्या सुरुवातीलाच द्रमुक प्रमुखांच्या भूमिकेची प्रशंसा केली. पुढे राधा रवी यांचा उल्लेख करत तिने लिहिलं, 'तुम्हालाही एका महिलेनेच जन्म दिला आहे हे लक्षात ठेवा. एका महिलेविषयी असं वक्तव्य करणं तुम्हाला मुळीच शोभत नाही. या अशा पुरुषांचा दररोज सामना करणाऱ्या महिलांविषयी मला वाईट वाटतं, माझी सहानुभूती त्यांच्यासोबत आहे.'
राधा रवी यांनी काय वक्तव्य केलं होतं?
ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी नयनताराविषयी रवी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. नयनतारा भूतासोबतच सीतेचीही भूमिका निभावून झाली आहे. तिच्याआधी देवीची भूमिका साकारण्यासाठी के.आर विजय यांना पसंती दिली जायची. पण, आज मात्र देवीच्या भूमिकेसाठी कोणाचीही निवड करण्यात येत आहे.'
रवी यांच्या याच वक्तव्यानंतर नयनताराने त्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळालं. चाहत्यांना विनंती करत तिने राधा रवींसारख्या कोणत्याच व्यक्तीला आणि त्यांच्या या बेताल वक्तव्याला दुजोरा न देण्याची मागणी केली होती.
एक अभिनेत्री म्हणून मी भूताचू भूमिका साकारेन, सीतेची भूमिका साकारेन किंवा मी एक मैत्रीण होईन, पत्नी होईन आणि प्रेमिका होईन... कारण, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच माझं काम आहे, असं तिने स्पष्ट केलं.