'धन्यवाद श्री राज ठाकरे', अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

3 मे ला अक्षय तृतीया आणि ईद निमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

Updated: May 3, 2022, 09:28 PM IST
'धन्यवाद श्री राज ठाकरे', अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत title=

मुंबई : राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली सभा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. जो-तो त्यांच्या या सभेतील मुद्यांबद्दल बोलत आहेत. यामध्ये त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला होता, तो म्हणजे मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा. राज ठाकरे यांनी या सभेत सांगितले की, 3 मेपर्यंत मी वाट बघणार, पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ द्या. ज्यामुळे सर्वांचंच लक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेकडे असताना, अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) चर्चेत आली आहे.

खरंतर आज म्हणजेच 3 मे ला अक्षय तृतीया आणि ईद निमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा, तर हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये प्राजक्ताने राज ठाकरे यांचे देखील आभार मानले आहेत.

प्राजक्ता माळीच्या पोस्टची का होतेय चर्चा?

‘सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसंच मुस्लीम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.)

असो, आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे सगळ्याचसाठी. परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खूप धन्यवाद’

अशी पोस्ट तिने लिहिली. मात्र काही वेळानंतर तिने तिची ही पोस्ट एडिट केली, ज्यानंतर तिने फक्त शुभेच्छा देणारा मजकूर ठेवत बाकी सर्व एडिट केलं आहे .

इतकंच नव्हे तर या पोस्टवरील कमेंट्स देखील तिने बंद केले. त्यामुळे नेटकरी त्यावर व्यक्त होऊ शकत नाहीत.

प्राजक्ता माळीची आधीची पोस्ट

प्राजक्ता माळीची एडिट केलेली पोस्ट