कोरोनामुळे अभिनेत्रीकडून विवाहसोहळा रद्द

कोरोना व्हायरसचा फटका कलाविश्वातील एका लोकप्रिय सेलिब्रिटीला बसला आहे

Updated: Mar 16, 2020, 01:22 PM IST
कोरोनामुळे अभिनेत्रीकडून विवाहसोहळा रद्द
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : चीनमध्ये थैमान घालणारा Corona कोरोना व्हायरस आता जगातील अनेक राष्ट्रांमध्ये झपाट्याने पसरु लागला आहे. चीनमागोमागच इराण, इटली, स्पेन आणि भारत या राष्ट्रांमध्ये कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. अशा या राष्ट्रांमध्ये प्रशासनाकडून  मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगली जात असून, कोरोनाच्या चाचण्याही सुरु आहेत. प्राथमिक स्तरावर कोरोना रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपायही योजले जात आहेत. असं असतानाच कोरोनाचे थेट परिणाम हे प्रत्येक क्षेत्रावर आणि अनेकांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येऊ लागले आहेत.  

दिनचर्येपासून राहणीमानापर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम केलेल्या या कोरोना व्हायरसचा फटका कलाविश्वातील एका लोकप्रिय सेलिब्रिटीला बसला आहे. ज्यामुळे त्या सेलिब्रिटीने अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला विवाहसोहळा तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याविषयीची माहिती देणारा हा चेहरा म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर उत्तरा उन्नीचा. उत्तराने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून होणाऱ्या पतीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'साऱ्या विश्वावर भयावह अशा कोरोना व्हायरसचं सावट असताना आम्ही आमचा विवाहसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आम्ही हा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनेक पाहुण्यांची आम्ही क्षमा मागतो ज्यांनी या सोहळ्यासाठी आधीच तयारी सुरु केली होती, तिकीटं काढली होती. आम्ही त्याच दिवशी थाली-केट्टू ही प्रथा मंदिरात पार पाडणार आहोत. याविषयीच्या नव्या तारखांची आम्ही माहिती देऊच.'

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

लग्नाची निर्धारित तारीख पुढे ढकलली असल्याचं लिहित तिने सर्वांनाच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उत्तराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर ती झपाट्याने व्हायरल झाली. ज्यानंतर तिच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं.