'पानिपत'च्या प्रदर्शनापूर्वीच अफगाण चिंतातूर?

 या चित्रपटातून पुन्हा एकदा.... 

Updated: Nov 6, 2019, 11:57 AM IST
'पानिपत'च्या प्रदर्शनापूर्वीच अफगाण चिंतातूर?  title=
पानिपत

मुंबई : संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सेनन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'पानिपत' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर संमिश्र प्रतिक्रियांचा भडीमार या ट्रेलरवर करण्यात आला. काही प्रेक्षकांनी या चित्रपटासाठीची उत्सुकता व्यक्त केली आहे. तर, प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटामुळे अफगाण सरकार चिंतेत आल्याचं म्हटलं जात आहे. 

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपट अफगाण सरकारला चिंतातूर करुन गेला आहे. ज्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यासाठीची वेळ योग्य नाही, कारण चित्रपट हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे, अशी भूमिका अफगाण सरकारकडून मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मात्यांशी अफगाण सरकारची चर्चा सुरु असल्याचंही कळत आहे. यावर येणाऱ्या पुढील घ़डामोडींवर चित्रपटाचं भवितव्य निर्धारित होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

ऐतिहासिक कालखंडामध्ये घडलेल्या आणि मराठा साम्राज्याच्या, देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर 'पानिपत'मधून प्रकाश टाकण्यात येत आहे. सदाशिव राव भाऊ यांच्या नेतृत्वात मराठा सैन्याने अफगाण अहमद शाह अब्दाली याच्या सैन्याशी लढेल्या युद्धावर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे. एका ऐतिहासिक कालखंडात स्थिरावलेल्या या चित्रपटातून पुन्हा एकदा मराठ्यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर साकारण्यात येणार आहे. ६ डिसेंबरला हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.