मुंबई : जेष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचं २ फेब्रुवारीला वयाच्या 93 व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं. रमेश देव यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी या दुख:द घटनेची माहिती दिली. रमेश देव यांनी असंख्य मराठी आणि हिंदी सिनेमात भूमिका केल्या होत्या. आज दुपारी रमेश देव यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पारसी वाडा स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना अजिंक्य देव अतिशय भावुक झाले.
मीडियासोबत संवाद साधताना अजिंक्य म्हणाले की, काल रात्री माझ्या वडिलांचं हृद्य विकाराच्या झटक्याने निधन झालं. असं अचानकपणे होईल याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. ते खूप एनर्जेटिक आणि सकारात्मक होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ते अनेकदा मृत्यूच्या दारातून परतले होते. त्यामुळे यावेळीही ते या प्रसंगाला हरवून पुन्हा जिंकून येतील असं आम्हाला वाटलं होतं. पण, आमचे बाबा आज आमच्यात नाहीत. ते आम्हाला सोडून गेले आहेत. हे सांगताना, अजिंक्य यांना अश्रू अनावर झाले.
रमेश देव यांच्या सिने कारकिर्दीची सुरुवात 1950 मध्ये झाली. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही आपल्या भूमिकेची छाप पाडली. सुरुवातीला त्यांना हिंदीत छोट्या भूमिका मिळाल्या. मात्र त्यानंतर त्यांना हिंदी सिनेमात सहकलाकाराची भूमिका मिळाली.
अवघ्या काही दिवसांपूर्वी 93 वा वाढदिवस
अवघ्या 3 दिवसांपूर्वी रमेश देव यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने देव यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठी हानी झाली आहे.