IPL Mega Auction 2025 13 Year Old Rahul Dravid Vs Delhi Fight: इंडियन प्रिमिअर लीगचा दोन दिवसाचा मेगा ऑक्शन रविवार आणि सोमवारी पार पडला. दहा संघांच्या मालकांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत नामवंत खेळाडूंना आपल्या संघात घेतलं. यामध्ये सर्वाधिक बोली दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंतवर लावण्यात आली. त्याला 27 कोटी रुपयांच्या बोलीवर लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने विकत घेतलं. विशेष म्हणजे नामवंत खेळाडूंबरोबरच नवख्या खेळाडूंवरही या लिलावत चांगल्या रक्कमच्या बोली लागल्या. त्यातही खास करुन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडूवर बोली लावताना राजस्थान रॉयल्सचा संघ आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये चुरस पाहायला मिळाली. नेमकं ऑक्शनमध्ये काय घडलं याचा व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
ज्या तरुण खेळाडूसाठी दिल्ली आणि राजस्थानमध्ये चढाओढ सुरु होती त्याचं नाव आहे, वैभव सूर्यवंशी! (Vaibhav Suryavanshi) वैभव हा अवघ्या 13 वर्षांचा आहे. मात्र या लिलावमध्ये त्याची बेस प्राइज 30 लाख रुपये इतकी होती. बेस प्राइजच्या जवळपास चौपट पैशांना राजस्थानने या तरुण खेळाडूला संघात घेतलं आहे. विशेष म्हणजे राजस्थानच्या ऑक्शन टेबलवर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू तसेच माजी प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड उपस्थित होता. त्याच्या उपस्थितीत वैभववर एवढी बोली लावण्यात आल्याने नक्कीच या पोरात काहीतरी खास असणार अशी चर्चा सुरु झाली आहे. राहुल द्रविडचा उत्तम टॅलेंट पारखण्यात हातखंड मानला जातो. त्यामुळेच दिल्लीने लावलेल्या बोलीच्या जवळपास दुप्पट बोली लावत त्यांना चेक मेट करुन या तरुणाला संघात घेण्यासाठी राजस्थानने खिसा खाली केल्याचं दिसून आलं. नेमकं ऑक्शनमध्ये घडलं काय पाहूयात...
दिल्ली कॅपिटल्सने सर्वात आधी 30 लाखांच्या बेस प्राइजवर वैभवला संघात घेण्यासाठी बोली लावली. त्यानंतर राजस्थानच्या संघाने त्यावर पाच लाखांची भर घालत 35 लाखांची बोली लावली. त्यानंतर दिल्लीने पुन्हा 40 लाखांची बोली लावल्यावर राहुल द्रविड ज्या ऑक्शन टेबलवर बसलेला त्या राजस्थानच्या संघाने थेट 65 लाखांची बोली लावली. त्यावर दिल्लीने 70 लाखांची बोली लावल्यानंतर यामध्ये थेट 40 लाखांची भर घालत राजस्थानने 1.10 कोटींची बोली या 13 वर्षीय मुलावर लावली. अखेर दिल्लीने माघार घेतली आणि हा आयपीएलच्या एतिहासातील सर्वात तरुण खेळाडू राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या राजस्थानच्या संघाचा भाग झाला.
Here's how the 13-year-old Vaibhav Suryavanshi - the youngest ever player to be bought in the auction - joined #RR #TATAIPL | @rajasthanroyals pic.twitter.com/eme92pM7jy
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 चा आहे. वैभव सूर्यवंशी हा अष्टपैलू खेळाडू आहे. वैभवने बिहारसाठी 5 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 दिवसांचे 2 सामने झाले. लाल चेंडूने खेळवण्यात आलेले हे सामने 19 वर्षांखालील संघांचे होते. भारताच्या अंडर-19 संघात वैभव देखील होता. यावेळी त्याने दमदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. वैभवने आतपर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली आहे.