'मिशन मंगल'च्या कमाईचा विक्रमी कक्षेत प्रवेश....

पाहा कुठवर पोहोचले कमाईचे आकडे 

Updated: Aug 19, 2019, 01:25 PM IST
'मिशन मंगल'च्या कमाईचा विक्रमी कक्षेत प्रवेश....  title=

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू अशा कलाकारांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या मिशन मंगलला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी वेग पकडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मिशन मंगलची विक्रमी घोडदौड सुरु आहे असंच म्हणावं लागेल. 

सलग चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे शंभर कोटींच्या नजीक पोहोचणार असल्याचं चित्र आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती देत एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला म्हणजेच चौथ्या दिवसापर्यंत या चित्रपटाने भारतात ९७. ५६ कोटींची कमाई केली आहे. 

कमाईच्या आकड्यांचा हा वेग कायम राहिल्यास शंभर कोटींची सीमा ओलांडण्यास फार वेळ लागणार नाही, हेसुद्धा तितकच खरं. मुख्य म्हणजे दणदणीत सुरुवात मिळालेला खिलाडी कुमारचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीनेही ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. 

मिशन मंगलमध्ये अक्षय कुमार इस्रो वैज्ञानिक 'राकेश धवन' ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तर, विद्या बालन (तारा शिंदे), तापसी पन्नू (कृतिका अग्रवाल), नित्या मेनन (वर्षा पिल्लई), शरमन जोशी (परमेश्वर नायडू) आणि अनंत अय्यर (एचजी दत्तात्रेय) या कलाकरांच्याही अभिनयाची आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांची जोड मिळाली आहे.