नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच मुंबईच्या कमला मिल कम्पाऊंडमधल्या 'मोजो बिस्ट्रो' पबला लागलेल्या आगीत १४ जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी संवेदना व्यक्त केल्या... परंतु, नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या महानायक या वेळेला मात्र शांत राहिले... त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही. यामुळे त्यांचा एक फॅन मात्र त्यांच्यावर नाराज झाला.... आणि त्यानं आपली ही नाराजीही व्यक्त केली. अमिताभ बच्चन यांनी यालाच प्रत्युत्तर दिलंय.
रोहित बोराडे नावाच्या एका व्यक्तीनं 'मुंबईमध्ये राहूनही कोणत्याही दुर्घटनेबद्दल ना कोणतं ट्विट केलं ना फेसबुक पोस्ट... पैसाच सर्व काही नाही. मी नेहमीच तुमचा फॅन राहील' असं रोहितनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या या फॅनच्या नाराजीला उत्तर दिलं... 'तुम्ही खरंच म्हटलं... नाही करत मी... कारण इथं फक्त संवेदनांचा प्रचार होतो... खरी संवेदना नाही. इथं संवेदना दिखावा आहे... लोकांसाठी... पण काय केलं त्यासाठी? तुम्हीच सांगा... तुम्ही काय करू शकता अशा दुर्घटनांचं? जेव्हा काही करायचं असतं तेव्हा ते मी करतो. तुम्ही किंवा आणखी कुणाला सांगून नाही, कारण तो प्रचार असेल. संवेदना नाही. पैशांसोबत अशा दुर्घटना किंवा तुमची विचारसरणी जोडू नये... असं करून तुम्ही स्वत:ची दुर्बलता व्यक्त करत आहात. बाबूजींची ही यावरच कविता वाचा... 'क्या करू संवेदना लेकर तुम्हारी क्या करूं'
T 2758 - kya karoon samvedna lekar tumhaari kya karoon .. pic.twitter.com/MXsrJf6ecY
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 31, 2017