मुंबई : ''मी ज्या मरण यातना भोगल्या तशाच शाहरुखनेही भोगाव्या', हे शब्द दुमका येथील अल्पवयीन विद्यार्थिनी अंकिताचे आहेत. गंभीर भाजल्यानंतर ती रुग्णालयात जीवन-मृत्यूला लढा देत होती. हे संपूर्ण प्रकरण 23 ऑगस्टचं आहे. जेव्हा एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या शाहरुखने अंकितावर पेट्रोल ओतून तिला पेटवल होतं, 28 ऑगस्ट रोजी रांची रिम्समध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अंकिताच्या मृत्यूवरून झारखंडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषीला फाशी देण्याची मागणी सर्वस्तरावरुन होत आहे. दरम्यान, अंकिताच्या शेवटच्या विधानाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिम्समध्ये उपचारादरम्यान अंकिता वेदनेने ओरडताना दिसतेय. आणि म्हणातेय की, 'मी ज्या प्रकारे मरत आहे, त्याच प्रकारे शाहरुखचाही मृत्यू झाला पाहिजे.'
पाच दिवस मृत्यूशी झुंज देणारी दुमका येथील अंकिता अखेर हरली. आज सकाळी रांचीच्या रिम्समध्ये तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूचं वृत्त दुमका येथे कळताच संतप्त लोकांनी रस्त्यावर उतरून अंकिताला न्याय देण्याची मागणी करत दुमका टॉवर चौक येथे चक्का जाम केला. प्रशासकीय अधिकारीही अंकिताच्या घरी पोहोचले होते.
दुमका नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जरुवाडीह परिसरात राहणाऱ्या शाहरुखने अंकितावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं. अंकिताने शाहरुखशी फोनवर बोलण्यास नकार दिल्यामुळेच तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. गंभीररित्या भाजलेल्या अंकिताला दुमका मेडिकल कॉलेजनंतर रांची रिम्समध्ये रेफर हलवण्यात आलं.
अंकिताच्या मृत्यूनंतर आम्ही हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळी एसपी म्हणाले की, या संदर्भात जेवढे ठोस पुरावे मिळाले आहेत आणि पीडितेने मृत्यूपत्रात जे काही सांगितलं आहे, त्या आधारे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा आमचा उद्देश असेल.