सरकारी नोकरी सोडली नसती तर महाराष्ट्राने कधीच पाहिला नसता मराठीतला सर्वात मोठा स्टार!

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 30, 2024, 06:02 PM IST
सरकारी नोकरी सोडली नसती तर महाराष्ट्राने कधीच पाहिला नसता मराठीतला सर्वात मोठा स्टार! title=
Ashok Saraf left his government job to enter films became a superstar in marathi fiml industry

Ashok Saraf: मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण 2023 जाहिर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी सिनेमातही अशोक सराफ यांच्या भूमिका गाजल्या आहेत. कधी कधी मुख्य कलाकारापेक्षा अशोक सराफ यांचीच भूमिका अधिक भाव खावून जाते. विनोदी चित्रपटांबरोबर अनेक भावनाप्रधान चित्रपटातही अशोक सराफ यांनी काम केले होते. अशोक सराफ यांनी आजपर्यंत 300 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. मात्र, अशोक सराफ यांच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. 

कला क्षेत्रात येण्यापूर्वी ते सरकारी नोकरी करत होते. मात्र अभिनयाच्या वेडापायी त्यांनी सरकारी नोकरी सोडली. अशोक सराफ सरकारी बँकेत नोकरी करत होते. अशोक यांनी अभिनय क्षेत्रात करियर करावे, यासाठी त्यांचा वडिलांचा नकार होता. आपल्या मुलाने सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेचा मान ठेवून ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होती. त्याचबरोबर त्यांचे स्वप्नही पूर्ण करण्याच्या मागे होती. 

बँकेत नोकरी करता करता ते थिएटरमध्येही काम करत होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते नेहमी झटत राहिले. काही काळाने अशोक सराफ यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयासाठी दिला. कलाक्षेत्रात जाण्याचा त्यांचा हा निर्णय योग्यच ठरला. अशोक सराफ यांच्या भूमिका गाजू लागल्या. मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ हे नाव लोकप्रिय होऊ लागले. 

अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही काम केले. सिंघम, करण अर्जून, गुप्त, प्यार किया तो डरना क्या, यासारख्या 50 हून अधिक हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसंच, हम पाँच ही त्यांची मालिका त्याकाळी खूप गाजली होती. चित्रपट आणि टिव्ही या दोन्ही क्षेत्रात त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.   

अशोक सराफ यांनी 1969 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. मराठी सिनेसृष्टीत त्यांना अशोक सम्राट या नावानेही ओळखले जाते. तर, काही कलाकार मंडळी मोठ्या प्रेमाने त्यांना अशोक मामा असंही म्हणतात. आजही अशोक सराफ यांचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जातात. त्यांच्या चित्रपटाती पात्रांवर लोकांचे विशेष प्रेम आहे. अशी ही बनवा बनवी चित्रपटातील धनंजय माने हे पात्र आणि त्याचे संवाद आजही लोकांच्या तोंडी आहेत.