मृत्यू जवळून पाहिला, म्हणत राणा डग्गुबतीला भावना अनावर

... आणि त्याचे डोळे पाणावले 

Updated: Nov 24, 2020, 04:43 PM IST
मृत्यू जवळून पाहिला,  म्हणत राणा डग्गुबतीला भावना अनावर

मुंबई : दमदार चित्रपटांतून तितक्याच दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता rana daggubati राणा डग्गुबती यानं फक्त दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी चित्रपट रसिकांच्या मनातही घर केलं आहे. प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळणारा हा अभिनेता येत्या काळात पुन्हा एकदा तितक्याच प्रभावी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, राणानं सध्या लक्ष वेधलं आहे ते म्हणजे एका वेगळ्याच कारणामुळे. 

सर्वांना कायमच सेलिब्रिटी मंडळींच्या आयुष्याचा, त्यांच्या जीवनशैलीचा हेवा वाटत असतो. पण, राणाच्या बाबतीततही चाहत्यांचा असाच दृष्टीकोन. पण, राणा आज अगदी प्रसन्न दिसत असला तरीही जीवनातील एका टप्प्यावर आपण मृत्यू अगदी जवळून पाहिल्याचं मात्र तो न विसरता सांगतो. 

अभिनेत्री समंथा अक्कीनेनी Samantha Akkineni हिच्या चॅट शोमध्ये राणानं नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या खासगी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या गेल्या. तिथंच जीवनातील या टप्प्याबाबतही चर्चा झाली. 

राणानं समंथाच्या प्रश्नावर उत्तर देत आपल्या हृदयात केल्कीफिकेशन Calcification झाल्यामुळं अडचणी वाढल्याचं सांगितलं. ज्यामुळं त्याच्या किडनीवरही परिणाम झाले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यामध्ये 70 टक्के पक्षाघात आणि 30 टक्के मृत्यूचीही शक्यता होती. या परिस्थितीमुळं जीवनात एक प्रकारे अल्पविरामच आला होता, असं सांगताना राणाला भावना अनावर झाल्या आणि त्याचे डोळे पाणावले. 

 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर राणाचा एक फोटोही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो अगदी निर्जीव दिसत होता. कोणत्यातरी मोठ्या आजाराशी झुंज देत असल्याप्रमाणं त्याची प्रकृती खालावली होती. सोशल मीडियावर त्याचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली होती.