मुंबई : यंदाच्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे बच्चन कुटुंबातर्फे एका दिमाखदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. या पार्टीमद्ये अखेरच्या काही तासांमध्ये असं काही घडलं की, मोठा अपघात टळला.
बऱ्याच वर्षांपासून ऐश्वर्या राय बच्चन हिच्याकडे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या अर्चना आनंद यांच्या लेहंग्याला एका पणतीच्या संपर्कात आल्यामुळे आग लागली. ज्यानंतर अभिनेता शाहरुख खान याने मोठ्या धाडसाने ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आपल्या शेरवानीच्या सहाय्याने त्याने हा प्रसंग निभावून नेला अशी माहिती समोर आली.
शाहरुखच्या समयसूचकतेची आणि सतर्कतेची सर्वांनीच प्रशंसा केली. शाहरुख प्रमाणेच आणखी एका व्यक्तीमुळे अर्चना आनंद या मोठ्या दुखापतीतून बचावल्या. ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून खुद्द ऐश्वर्याच आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ऐश्वर्याने अर्चनाच्या लेहंग्याने पेट घेतल्याचं लक्षात येताच लेहंग्याचा पेटलेला आणि जळलेला भाग फाडला जेणेकरून अर्चना यांना गंभीर दुखापत होणार नाही. पुढे शाहरुखने त्याच्या शेरवानीच्या मदतीने एक मोठा अपघात टाळला.
एका अर्थी शाहरुखप्रमाणेच ऐश्वर्याच्या या कृतीमुळेही तिच्या मॅनेजरला मोठी दुखापत झाली नाही. या घटनेनंतर काही किरकोळ दुखापती पाहता अर्चना आनंद यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे.