Saumya Tandon In Hospital : 'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून सौम्या टंडनला ओळखले जाते. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. पण आता सौम्या टंडनच्या एका पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सौम्या टंडनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने याचे फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सौम्या टंडनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सौम्या ही रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या हातावर सलाईन लावल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटो रुग्णालयातील काही वस्तू पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या फोटोत ती रुग्णालयातील बेडवर झोपून वेबसीरिज पाहत असल्याचे दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना तिने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहे.
"फोटो हे कायमच सुंदर नसतात आणि जीवन हे कायमच हसतमुख नसते. सध्या मी बरी होत आहे आणि लवकरच फिट होईन. तुमच्या शुभेच्छांसाही खूप खूप धन्यवाद", असे कॅप्शन सौम्या टंडनने दिले आहे. सौम्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहत्यांनी तिला लवकर बरी होण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला काय झाले आहे, असेही विचारले आहे.
सौम्या टंडनने मॉडलिंगनंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ चित्रपटातही तिने छोटी भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने वेलकम टू पंजाब या पंजाबी चित्रपटातही ती झळकली. त्यासोबतच तिने 'ऐसा देस है मेरा', 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'भाभी जी घर पर हैं!' या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिने अनिता भाभी हे पात्र साकारले होते. पण 2020 मध्ये तिने या कार्यक्रमाला रामराम केला. सौम्या टंडनने 2016 मध्ये तिचा बॉयफ्रेंड सौरभ सिंहसोबत लग्न केले आहे. लग्नाच्या आधी ते दोघेही 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते. सौम्याने 2018 मध्ये मुलाला जन्म दिला. सध्या ती तिच्या मुलाच्या संगोपनात व्यस्त आहे.