अभिनेत्रीचा जीव थोडक्यात वाचला, हल्लेखोऱ्याच्या गोळीबारात पोलीस जखमी

चित्रपटाचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे.

Updated: May 26, 2019, 02:26 PM IST
अभिनेत्रीचा जीव थोडक्यात वाचला, हल्लेखोऱ्याच्या गोळीबारात पोलीस जखमी title=

नवी दिल्ली : भोजपुरी अभिनेत्री ऋतु सिंहवर शनिवारी एका व्यक्तीने गोळी मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलच्या रुममध्ये ऋतु सिंह या अभिनेत्रीवर पिस्तुल रोखण्यात आलं होतं. उत्तरप्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंजमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने त्याचं ऋतुवर प्रेम असल्याचं सांगितलं. तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो सतत पाठलाग करत असल्याचं ऋतुने म्हटलंय. ऋतु सिंहने भोजपुरी चित्रपटातून अनेक भूमिका साकारल्या आहेत. 

रॉबर्ट्सगंजमध्ये गेल्या १० दिवसांपासून ऋतुच्या 'दुलारी बिटिया' या चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबईहून रॉबर्ट्सगंजमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी अचानक एका माथेफिरूने हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करत ऋतुवर बंदुक रोखली. या घटनेने चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या चित्रपटाचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे. हे वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा चित्रपटाचं शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी आरोपीने गोळी झाडली. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून पिस्तुल ताब्यात घेत आरोपीलाही ताब्यात घेण्यात घेतलं आहे.