गुलिगत सूरज चव्हाण आता रुपेरी पडद्यावर; 'राजाराणी' चित्रपटात दमदार एण्ट्री

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणचा गुलिगत दणका 'राजाराणी' चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 22, 2024, 04:17 PM IST
गुलिगत सूरज चव्हाण आता रुपेरी पडद्यावर; 'राजाराणी' चित्रपटात दमदार एण्ट्री title=

'बिग बॉस मराठी'चा यंदाचा पर्व अगदी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. याला कारण आहे या पर्वातील स्पर्धक. प्रत्येक स्पर्धक आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. यातील एक स्पर्धक ज्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे गुलिगत सुरज चव्हाण याने. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच टिक टॉक स्टार अशी सूरज चव्हाणची ओळख आहे. सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत त्यांच्यावर राज्य केलं. 'बिग बॉस'च्या घरात सूरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. खेळ समजला नसला तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मन जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सूरज स्वतःला 'बिग बॉस'च्या घरात सिद्ध करताना दिसतोय. 

सूरज चव्हाणचा जन्म छोट्याशा खेडेगावात झाला असून त्याने बिग बॉस सारख्या झगमगाटात येऊन स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं आहे. सध्या 'बिग बॉस मराठी' मुळे सूरज भलतात चर्चेत आला आहे. रिऍलिटी शोद्वारे सूरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सूरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'राजाराणी' या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मन जिंकली. सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या मित्राच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे.

सिनेमात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. सूरज चव्हाण हा चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. सूरजचा 'राजाराणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.