मुंबई : संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा रोजच बातम्यांचा विषय बनला आहे.
एकीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि 'घुमर' गाण्याला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या चित्रीकरणापासून काही संघटना विरोधाच्या भूमिकेत आहेत.
करणी सेना, राजपूत संघटना यांनी 'पद्मावती' चित्रपट आम्हांला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. तसे झाल्यास चित्रपटगृहांच्या नुकसानाला आम्ही जबाबदार राहणार नाही. असा धमकी वजा इशारा देण्यात आला आहे.
'पद्मावती' चित्रपटाच्या वादामध्ये आता भाजपा नेत्या उमा भारती यांनीदेखिल उडी घेतली आहे. उमा भारतींनी या चित्रपटाचा वाद संपवण्यासाठी एक मार्ग सुचवला आहे.
उमा भारतींच्या मते, ' 'पद्मावती' या चित्रपटाला राजपूतांशी न जोडता. त्याच्याकडे भारतीय स्त्री या दृष्टीकोनातून पहावे. तसेच सध्या या चित्रपटाशी निगडीत वाद मिटवण्यासाठी इतिहासकार, चित्रपट निर्माते, सेन्सर बोर्ड आणि ज्या लोकांनीआक्षेप घेतला आहे त्यांनी एकत्र बसून तोडगा काढावा.
'पद्मावती' चित्रपट येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दीपिका महाराणी पद्मावतीची, शाहीद कपूर रवल रतन सिंग तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खल्जींच्या भूमिकेत दिसणार आहे.