'तू आताही बेरोजगारच राहशील ना?', विचारताच अभिषेक बच्चन म्हणाला....

अभिषेकला पुन्हा एकदा बेरोजगार म्हणून हिणवत..... 

Updated: Oct 1, 2020, 04:21 PM IST
'तू आताही  बेरोजगारच राहशील ना?', विचारताच अभिषेक बच्चन म्हणाला....
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन याचा अभिनय विश्वात फारशी छाप पाडता आली नाही असं अनेकांतं मत. मुख्य म्हणजे चित्रपट कारकिर्दीच्या बाबतीच अभिषेकच्या नावे कमी चित्रपट असले तरीही काही चित्रपटांमधील त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. असं असलं तरीही या कलाकाराला अनेकदा सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. 

अभिषेकला पुन्हा एकदा बेरोजगार म्हणून हिणवत एका ट्विटर युजरनं त्याला खोचक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळीसुद्धा अभिषेकनं या युजरला त्याच्याच शैलीत उत्तर देत निरुत्तर केल्याचं पाहायला मिळालं. 
चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्याचं वृत्त प्रसिद्ध होताच यावर अभिषेकनं आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्यातील सर्वात आनंदाची बातमी, असं लिहित त्यानं यासंदर्भातील वृत्ताबाबचं ट्विट केलं. ज्यावर निशाणा साधत एका ट्विटर युजरनं थेट त्याच्या बेरोजगारीवरच टीका केली. 

'...पण तू तर आताही बेरोजगारच राहशील ना?', असं या युजरनं लिहिलं. ज्यावर उत्तर देत हे सारंकाही तुमच्याच हाती असल्याचं म्हणत अभिषेकने अतिशय थेट शब्दांत या खिल्ली उडवू पाहणाऱ्या युजरला उत्तर दिलं. 

'हे सारं काही तुमच्या (प्रेक्षकांच्या) हाती आहे. तुम्हाला आमचं काम आवडलं नाही, तर आम्हाला काम मिळणार ऩाही. त्यामुळं आमच्या पात्रतेस साजेसं काम आम्ही करतो. सोबतच सारंकाही सुरळीच आणि उत्तम होण्यासाठीची प्रार्थनाही करतो', असं त्यानं ट्विटमध्ये लिहिलं. 

 

चाहत्यांना सर्वतोपरी महत्त्व देणाऱ्या कलाकारांना अशा प्रकारच्या टीकेचं धनीही व्हावं लागतं. अशा वेळी मर्यादा पाळतच चुकीच्या पद्धतीनं टीका करणाऱ्यांना उत्तर देत ही कलाकार मंडळीही त्यांची बाजू स्पष्टपणे मांडण्याचाच प्रयत्न करतात. हेच अभिषेकनं दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झालं.