Ajay Devgn Rohit Shetty Interesting Story : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा मुख्य भूमिकेत झळकला होता. अजय देवगणने या चित्रपटात निडर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सिंघम चित्रपटामुळे अजय देवगणला प्रेक्षकांचे भरभरुन मिळाले. पण अजय देवगणने जेव्हा हा चित्रपट साईन केला, तेव्हा त्याला या चित्रपटाची स्क्रिप्टच माहिती नव्हती. तब्बल 13 वर्षांनी रोहित शेट्टीने याबद्दलचा खुलासा केला आहे.
रोहित शेट्टीने नुकतंच 'पिंकविला' या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सिंघम या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी रोहित शेट्टीने अजय देवगणचा एक किस्सा सांगितला. अजय देवगणने सिंघम चित्रपटाला होकार देण्यापूर्वी या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नव्हती, असा खुलासा रोहित शेट्टीने केला आहे. यावेळी रोहित म्हणाला, "मी आणि अजय देवगणने अनेक चित्रपट एकत्र केले होते. यात गोलमाल 3, बोल बच्चन या चित्रपटांचा समावेश आहे. त्यावेळी कुठेही सिंघम चित्रपटाचा संबंध नव्हता. अचानक मला एक डीव्हीडी सापडली. ती डीव्हीडी एका तमिळ चित्रपटाची आहे आणि तुम्हाला तो पाहायचा असेल तर पाहू शकता, असे मला सांगण्यात आले. त्यावेळी 'गोलमाल 3' चे प्रमोशन चालू होते. यादरम्यान एकदा मला तो चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. मी तो चित्रपट पाहिला आणि मला तो आवडला."
"यानंतर मग मला वाटलं की मी यातील मूळ व्यक्तिरेखेत बदल करुन एक उत्तम ॲक्शन चित्रपट बनवू शकतो. यानंतर मी अजय देवगणला फोन करत या चित्रपटाबद्दलची कल्पना दिली. तेव्हा मी त्याला हा असा असा एक चित्रपट आहे आणि तो आपण करु शकतो, असे सांगितले. त्यावेळी त्याने मला तू हा चित्रपट कधी बनवणार असा प्रश्न विचारला. त्यावर मी त्याला आता साडेचार महिने मी फ्री आहे, त्यादरम्यान मी हा चित्रपट बनवू शकतो."
"त्यावेळी अजय काही चित्रपटांच्या शूटींगसाठी लंडनला चालला होता. आमचे हे संभाषण साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर या दरम्यानचे आहे. त्यावेळी अजय देवगणने दाढी वाढवली होती. मी तेव्हा त्याला फक्त तू दाढी काढून ये आणि थोडी शरीरयष्टी सुधार असे सांगितले होते. त्यामुळे त्याला या चित्रपटाची स्क्रिप्ट काय आहे, याची कल्पना नव्हती. यानंतर आम्ही मार्च महिन्यात गोव्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु केले. अजय देवगण हा त्याच दिवशी रात्री 8 वाजता गोव्यात पोहोचला. मी त्याला पाहताच क्षणी तो सिंघमच्या पात्रासाठी परफेक्ट आहे", हे मला समजेल.
"यानंतर रात्री 10 वाजता आम्ही चित्रपटाच्या स्क्रिप्टचे वाचन करण्यास सुरुवात केली. रात्री 2 वाजता हा चित्रपट नक्की काय आहे, कशावर आधारित आहे, याबद्दल त्याला कल्पना आली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली", असा किस्सा रोहित शेट्टीने सांगितला. दरम्यान 'सिंघम' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगण, प्रकाश राज, काजल अग्रवाल, सुधांशू पांडे, गोविंद नामदेव यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते.