मुंबई : CoronaVirus कोरोना व्हायरसच्या सावटाखाली संपूर्ण जग सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. कित्येकांनी या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपल्या निकटवर्तीयांना गमावलं आहे. तर, लाखोंच्या संख्यने अनेकांवर या विषाणूशी लढण्यासाठीचे उपचार सुरु आहेत. भारतातही कोरोनाची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. सोबतच इथे दहशत आहे ती म्हणजे सोशल मीडियामुळे उठणाऱ्या अफवांची.
अनेक मेसेज, चर्चा आणि तथ्यहीन माहिती सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. ज्यामुळे चिंतेच्या या वातावरणात आणखी वाढ होत आहे. अशीच एक अफवा अभिनेता अजय देवगन याच्या कुटुंबाविषयीही पाहायला मिळाली. ज्यामध्ये त्याची पत्नी, अभिनेत्री काजोल आणि मुलगी न्यासा यांचीही प्रकृती बिघडल्याचं म्हणत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं गेलं.
आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता अखेर खुद्द अजयनेच पुढे येत ट्विट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या. 'काजोल आणि न्यासाप्रती चिंता व्यक्त करण्यासाठी मी तुमचा आभारी आहे. पण, त्या अगदी उत्तम आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या सर्व चर्चा या खोट्या आणि तथ्यहीन आहेत', असं ट्विट त्याने केलं.
Thank you for asking. Kajol & Nysa are absolutely fine. The rumour around their health is unfounded, untrue & baseless
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 30, 2020
नेमकी अफवा काय होती?
अजयची मुलगी न्यासा हिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे काजोल तिला घेऊन थेट रुग्णालयात पोहोचल्याचं म्हटलं गेलं होतं. ज्यानंतर काजोल आणि न्यासाचेही बरेच फोटो व्हायरल झाले. अनेकांनी काजोलही अस्वस्थ असल्याचं म्हटलं होतं.
सेलिब्रिटी वर्तुळातील या कुटुंबाविषयीच्या सर्व अफवा अजयने धुडकावून लावल्या आहेत. पण, अशा किंवा इतरही काही चर्चांवर कोणत्याही पुराव्याअभावी विश्वास न ठेवणं हे असंख्य नेटकऱ्यांचं काम आहे. सध्याच्या घडीला ही त्यांची जबाबदारी आहे, जेणेकरुन कोरोनाविषयीची चुकीची माहिती तग धरु शकणार नाही.