Kesari Movie Song : 'केसरी'चा अर्थ सांगत खिलाडी कुमार म्हणतोय 'अज्ज सिंग गरजेगाssss'

केसरी रंग का मतलब समझते हो....? 

Updated: Mar 5, 2019, 03:43 PM IST
Kesari Movie Song : 'केसरी'चा अर्थ सांगत खिलाडी कुमार म्हणतोय 'अज्ज सिंग गरजेगाssss' title=

मुंबई : केसरी रंग का मतलब समझते हो....? असं विचारणारा, जवानाच्या वेशातील खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार डोळ्यांसमोर येतो आणि खऱ्या अर्थाने उलगडतो या केसरीचा अर्थ. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आज सिंग गरजेगा... असे बोल असणारं हे गाणं ऐकताना डोळ्यांसमोर येणारे सारागढीच्या लढाईतील हे शिपाई अक्षरश: अंगावर काटा उभा करत आहेत. 

शौर्य, हौतात्म्य यांचं प्रतिक म्हणजे 'केसरी'. असं गाण्याच्या सुरुवातीला स्पष्ट होतं आणि पुढे शीख सैनिकांची महतीच जणून गाण्यात पाहायला मिळते. एक एक सिंग सव्वा लाख ओत्ते भारी... ही ओळच सारंकाही सांगून जाते. तर अक्षय कुमारच्या नेतृत्त्वाखाली प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही फौज शौर्याची वेगळी व्याख्या या गाण्याच्या निमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. 

सारागढीच्या युद्धावर भाष्य करणाऱ्या केसरी या चित्रपटाविषयी बऱ्याच चर्चा सुरू आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी धुसर झालेल्या या शौर्यगाथेची झलक गाण्यातून पाहायला मिळत आहे. साहसदृश्यं, देशभक्ती आणि कला या साऱ्याची सांगड घालत आज सिंग गरजेगा हे  गाणं साकारण्यात आलं आहे. जॅझी बी याने अस्सल पंजाबी शैलीतील हे गाणं गायलं असून, चिरंतन भट्ट यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. कुंवर जुनेजाने लिहिलेल्या या गाण्याच्या ओळी चित्रपटाच्या कथानकाला आणि त्यातील प्रत्येक पात्राला समर्पित आहेत. निव्वळ अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांची ही गाथा २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग सिंग याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.