मुंबई : खात्यात इतके से हवेत ना, की कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी मागेपुढे विचार करावा नाही लागला पाहिजे... असं आपण अनेकदा बोलतो. प्रत्येक सर्वसामान्य नागरिक जीवनात आपण एकदातरी गडगंज पैसे कमवावेत अशी स्वप्न पाहतो. याच स्वप्नांना बळ देतो तो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम. (Kaun Banega Crorepati 14)
बिग बींचं सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचं एकंदर स्वरुप पाहता गेल्या कैक वर्षांपासून या कार्यक्रमाची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे. यातच आता हा कार्यक्रम एका नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Amitabh bachchan)
सदर कार्यक्रमाकडून आता प्रेक्षकांना सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे. 9 एप्रिलपासून रात्री 9 वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्याची तुमचीही इच्छा आहे ?
तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, हे आधी जाणून घ्या.... कारण तुमच्या स्वप्नांना आता मिळणार KBC चं बळ...
केबीसीच्या 14 व्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला 9 एप्रिलपासून यामध्ये सहभागी होता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.
बिग बी रात्री 9 वाजता जो प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत द्यावं लागणार आहे. ज्यांचं उत्तर योग्य असेल त्यांना पुढच्या फेरीसाठी निवडलं जाईल.
कार्यक्रमासाठी कशी कराल तयारी ?
केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी काही खास मुद्दे अनुसरून तयारी करणं तितकंच महत्त्वाचं. यामध्ये ज्यांची बुद्धीमत्ता सक्षम आहे, त्यांना फारसे कष्ट घेण्याची गरज नाही.
कार्यक्रमाच्या तयारीसाठी तुम्ही ऐतिहासिक संदर्भ वाचू शकता. शालेय इतिहासाच्या पुस्तकांवरही तुम्ही भर देऊ शकता.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही दैनंदिन वर्तमानपत्र लावण्याची सवय ठेवा. सर्वसामान्य घडामोडींवर लक्ष द्या. आत्मविश्वास दांडगा ठेवा.