पाहा, आईसोबत दोरीउड्या खेळत मिलिंद सोमणने दिला 'लॉकडाऊन मंत्र'

एकदा त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच...   

Updated: Apr 22, 2020, 01:40 PM IST
पाहा, आईसोबत दोरीउड्या खेळत मिलिंद सोमणने दिला 'लॉकडाऊन मंत्र'  title=

मुंबई : Coronavirus च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अतिशय तणावाच्या अशा या परिस्थितीमध्ये प्रकत्येकजण आपल्या घरामध्ये राहून कोरोना  विषाणूवर मात करण्यासाठी सहकार्य करत आहे. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. असाच एक सेलिब्रिटी, अभिनेता, खराखुरा 'आयर्न मॅन' म्हणजेच अभिनेता मिलिंद सोमण चाहत्यांना चक्क लॉकडाऊन मंत्र देत आहे. 

मिलिंदने त्याच्या आईसोबत एकत्र येऊन एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने सर्वांनाच अनोखा असा लॉकडाऊन मंत्र दिला आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये मिलिंद त्याच्या आईसोबत दोरीच्या उड्या मारताना दिसत आहे. 

वयाचा अनुक एक टप्पा ओलांडल्यानंतर अनेक व्याधी सतावतात, शरीर साथ देणं कमी करणं असं वारंवार म्हटलं जातं. पण, या साऱ्याला मिलिंदची आई उषा सोमण या मात्र अपवाद ठरत आहे. सुनेसोबत लंगडीचा खेळ खेळणं असो, मिलिंदसोबत एखाद्या मॅरेथॉनला जाणं असो किंवा आता दोरी उड्या मारणं असो त्यांचा उत्साह तसूभरही मावळलेला दिसत नाही. 

मिलिंदने या व्हिडिओसोबतच आईचा आणि त्याचा एक फोटोही पोस्ट केला आहे. सेलिब्रिची माय- लेकाची ही जोडी नेटकऱ्यांमध्ये चांगलीच गाजत होती आणि यापुढेही गाजत राहील हेच हा व्हिडिओ पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. 

दरम्यान, देशात लॉकडाऊन लागू असला तरीही घरातल्या घरातच राहून शारीरिक सुदृढतेलाही प्राधान्य देण्यात यावं यासाठी मिलिंद आणि त्याचे कुटुंबीय आग्रही असल्याचं पाहायला मिळतं आहे.