मुंबई : सहसा दिवाळीचा प्रकाशमय सण हा मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत साजरा केला जातो. पण, एका बॉलिवूड अभिनेत्याने यंदाच्या वर्षी शहरी धकाधकीपासून दूर जात एका खास मार्गाने हा सण साजरा केला आहे. अतिशय पारंपरिक आणि प्रशंसनीय पद्धतीने हा सण साजरा करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी.
विविध भूमिकांना न्याय देत बहुविध पात्र रुपेरी पडद्यावर गाजवणाऱ्या पंकजने गोपाळगंजमधील बेलसंड हे त्याचं गाव गाठलं आहे. गावाला जाऊन सुट्टीचा आनंद घेत पंकज त्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदलही करत आहे. गावाच्या ठिकाणी असणारं वातावरण टीकून राहण्यासाठी तो वृक्षारोपणाचा संदेश सर्वांनाच देत आहे. गावात सकाळी फेरी मारण्यासाठी म्हणून निघालेल्या पंकजने दर २५ फूट अंतरावर एक रोपटं लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून, यामध्ये त्याने इतरही गावकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरणाही दिली आहे.
इतकच नव्हे तर, अस्सल घरगुती जेवणाचाही आस्वाद घेत आहे. लिट्टी चोखा हा उच्चर भारतीय पदार्थ बनवत पंकजने त्याच्या मित्रांसमवेत त्याचा आस्वादही घेतला आहे. पाच दिवसांची सुट्टी घेत पंकज त्याच्या गावाला जाऊन पुन्हा एकदा कामावर रुजू होत असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला गावाकडे रमणाऱ्या पंकजचा हा अंदाज सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. इतकत नव्हे तर, अनेकांनाच त्यांच्या गावाचीही आठवण झाली आहे.