मुंबई : कलाविश्व आणि सोशल मीडियाच्या वर्तुळात सध्या कोणतं नाव चर्चेत आहे, असा प्रश्न विचारल्याच एका सुरात उत्तर मिळेल......, रानू मंडल. कोलकाता येथील एका रेल्वे स्थानकावर 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गाऊन रानू यांनी साऱ्यांना थक्क केलं. सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या रानू यांच्या कलेची सर्वांनीच दाद दिली. अतकच नव्हे, तर संगीतकार हिमेश रेशमियाने त्यांच्याकडून एक गाणंही गाऊन घेतलं.
रानू यांच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव होत असतानाच आता या मदतीच्या प्रवाहात आणखी एक महत्त्वाची व्यक्ती जोडली गेली आहे. ती व्यक्ती म्हणजे 'दबंग खान' आणि 'भाईजान', अभिनेता सलमान खान. सलमानच्या वडिलांच्या एका सल्ल्यावरुनच हिमेशने रानू यांना अत्यंत महत्त्वाची संधी दिली. ज्यामागोमाग आता असं म्हटलं जात आहे, की रानू यांना सलमानने चक्क एक महागडं घर भेट स्वरुपात दिलं आहे.
सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या बऱ्याच चर्चांचा आढावा घेत दैनिक जागरणने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रानू यांसाठी सलमानने सढळ हस्ते मदत दिली असून त्यांना एक घर दिलं आहे. या घराची किंमत ५५ लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे सलमानकडून याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, इतरांची मदत करण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा सलमान रानूंच्या मदतीसाठी पुढे आलाच असेल हेसुद्धा नाकारता येत नाही, अशाच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
कोलकात्याच्या रानू मंडल या रेल्वे स्थानकावर गात असतानाच अतिंद्र चक्रवर्ती या तरुणाने त्यांचा एक व्हिडिओ चित्रीत केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला असंख्य व्ह्यूज मिळाले, शिवाय अनेकांनीच तो शेअरही केला. रातोरात रानू या संपूर्ण देशभरातील जनतेपर्यंत पोहोचल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.