मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी म्हणून अभिनेता सोनू सूद यानं मोलाचं योगदान दिलं. मजुरांसाठी तो खऱ्या अर्थानं देवदूत ठरला. असा हा अभिनेता पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी उभा ठाकला आहे.
सध्याच्या घडीला कोरोना काळात मृत पावलेल्या किंवा दुखापतग्रस्त झालेल्या मजुरांपैकी ४०० जणांच्या कुटुंबाला सोनूनं आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली.
'यादरम्यानच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या आणि दुखापतग्रस्त झालेल्या स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबीयांना मी त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मदत करु इच्छितो. त्यांना आधार देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे असं मला वाटतं', असं सोनू म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं.
झारखंड, बिहार, उत्तर प्रदेस यांसारख्या राज्यातील काही महत्त्वाच्या यंत्रणांपर्यंत सोनू पोहोचला असून, त्यानं मजुरांच्या कुटुबीयांची माहिती, बँक खात्यांचा तपशील गोळा करण्यास सुरुवातही केली आहे. कोरोना विषाणूमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोनूनं स्वत:च्या जबाबदारीवर हजारो मजुरांना त्यांत्या मुळ गावी पोहोचवल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकंच नव्हे, तर निसर्ग चक्रीवादळामुळं तडाखा बसलेल्यांच्या मदतीलाही त्यानं धाव घेतली होती. जवळपास २८ हजारहून अधिक नागरिकांमध्ये त्यानं आपल्या साथीदारांच्या सहाय्यानं खाण्याच्या पाकिटांचं वाटप केलं होतं.