मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकर, अनन्या पांडे आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा 'पती पत्नी और वो' प्रदर्शित होण्याआधीच काही कारणांमुळे चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये असणाऱ्या कार्तिक आर्यनच्या एका डायलॉगमुळे चित्रपटावर काही नेटकऱ्यांचा रोष ओढावला आहे.
मुदस्सर अजीज दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या (पतीच्या) भूमिकेत दिसणारा कार्तिक एक डायलॉग म्हणताना दिसतो. ज्यामध्ये शारीरिक संबंधांविषयी वक्तव्य करत असतानात येथे बलात्काराचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे पती- पत्नीच्या नात्याला असे संदर्भ दिल्यामुळे नेटकऱ्यांनी कार्तिकसह या चित्रपटावरही टटीका करण्यास सुरुवात केली.
'पती पत्नी और वो'मधील त्याच्या या संवादावरुन प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहता अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने या प्रकरणी माफी मागितली आहे. ''आम्ही कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखावलं असेल, तर त्याबद्दल मी माफी मागते. कारण, य़ामागे असं कोणाला दुखावण्याचा कोणताच हेतू नव्हता. किंबहुना 'पती पत्नी और वो' या चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची तशी विचारसणी नाही'', असं तिने स्पष्ट केलं.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका डायलॉगमुळे उमटणाऱ्या संतप्त प्रतिक्रिया पाहता, चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी कायमच महिलांचा सन्मान केला असल्याचं तिने सांगितलं. आपण स्वत: स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत अशा अनेक चित्रपटांना आणि तगड्या प्रस्तावांना आपण नाकारल्याचंही भूमी म्हणाली. दरम्यान, चित्रपटातील 'त्या' डायलॉगविषयीच्या प्रतिक्रिया पाहता त्यावर पुन्हा काम केलं जाण्याचीही चिन्हं असल्याचं कळत आहे.