Corona Lockdown : पुढ्यातील अन्नाचीही किंमत कळली; जान्हवी कपूरची भावूक पोस्ट

अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश विभागांतील व्यवहार ठप्प झाले. 

Updated: Apr 1, 2020, 01:10 PM IST
Corona Lockdown : पुढ्यातील अन्नाचीही किंमत कळली; जान्हवी कपूरची भावूक पोस्ट  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीला चीन, मग इराण आणि इटलीसारख्या राष्ट्रांमध्ये थैमान घालणाऱ्या या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आणि पाहता भारता देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली. हे सर्व चित्र पाहता सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली. 

परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश विभागांतील व्यवहार ठप्प झाले. दैनंदिन जीवनाची गतीही एका क्षणात कमी झाली. सतत व्यग्र असणारी कलाकार मंडळीसुद्धा यादरम्यान, चक्क त्यांच्या घराच्या व्यासपीठावर रमली. चित्रपट, जाहिराती, मालिका आणि एकंदरच कला वर्तुळाचं कामकाज थांबलं. पाहता पाहता सेलिब्रिटी मंडळी सेल्फ आयसोलेशनच्या पर्यायाला आपलंसं करताना दिसली आणि यातून खूप काही शिकलीसुद्धा. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूर हीसुद्धा त्याच कलाकारांपैकी एक. जिने जवळपास आठवडाभराचा काळ घरातच व्यतीत केल्यानंतर आपले काही अनुभव सर्वांपुढे आणले. यामध्ये तिने खऱ्या आयुष्याची किंमत आपल्या लक्षात आल्याचं विधान केलं. 

पुढ्यात येणाऱ्या अन्नापासून ते घरात आपली वाट पाहत बसणाऱ्या वडिलांविषयीसुद्धा तिने या पोस्टमध्ये भरभरून लिहिलं. 'कुटुंबाला आणि आपल्या घराला आपली कायमच गरज असचे हे मी जाणलं. हे मी शिकले. आपल्या माणसांसाठीच्या जबाबदाऱ्या मी शिकले. कुटुंबीयांचं स्वास्थ्य, घरातील वातावरण याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असतो हे मी शिकले', असं जान्हवीने लिहिलं. 

घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगत असताना एका दिवसात किती तास असतात याचा आपल्याला विसर पडतो, हेच वास्तव जाणत या एका दिवसात अनेक तास असल्याचं निरिक्षण जान्हवीने सर्वांपुढे ठेवलं. इतकंच नव्हे तर, घराच्या ड्रेसिंग रुममध्ये आपल्याला आजच्या क्षणीसुद्धा आईच्या म्हणजेच श्रीदेवी यांच्या अस्तित्वाची अनुभूती होते, असं लिहित तिने या विलगीकरण काळात घराशी, घरातल्या व्यक्तींशी जोडलं गेलेलं आणि बहरलेलं सुरेख नातं सर्वांपुढे ठेवलं.