रणबीरसोबतच्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलली कतरिना

खासगी आयुष्यात आलेल्या या वादळाकडे...

Updated: Dec 4, 2018, 01:19 PM IST
रणबीरसोबतच्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलली कतरिना

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ अनेकदा तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं बोलणं टाळते. माध्यमांच्या प्रश्नांनाही ती मोजक्या शब्दांमध्येच उत्तरं देते. पण, नुकतंच 'वोग' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मात्र तिने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर वक्तव्य केलं आहे. 

झालं गेलं सारंकाही विसरत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या स्वागत सोहळ्याला पोहोचणाऱ्या कतरिनाने सर्वांचीच मनं जिंकली. रणबीरसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्याचविषयी अखेर कतरिना खुलेपणाने बोलली आहे. 

ब्रेकअपमुळे सहसा व्यक्ती ही मानसिक आणि भावनिकरित्या कोलमडून जाते. पण, कतरिनाच्या बाबतीत तसं झालं नाही. आपल्यासाठी हे एक वरदानच ठरल्याचं ती 'वोग'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

'हे असं पहिल्यांदाच झालं असेल, जेव्हा मी स्वत:वर लक्ष केंद्रित करु शकत होते. मुख्य म्हणजे स्वत:कडे लक्ष देऊ लागताच एक बाब तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही स्वत:लाच नीट ओळखत नसता. ही काहीशी संकोचलेपणाची परिस्थीती असते. कारण, त्यावेळी एक प्रकारच्या स्वीकृतीची भावना असते', असं कतरिना म्हणाली. 

ब्रेकअपमुळे आपला गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला असं म्हणत हे सारंकाही आपल्यासाठी एक प्रकारे वरदानच ठरल्याचं मत तिने मांडलं. या नात्यातून विभक्त झाल्यानंतर मनात कोणतीही खंत होती का?, असा प्रश्न विचारला असता त्या प्रश्नाचं उत्तर देत the single-most useless emotion on the planet, असं सूचक विधान तिने केलं. 

आयुष्यात अशा टप्प्यावर असताना तुम्ही जो काही निर्णय घेता तो अगदी योग्य आणि सर्वोत्तम निर्णय ठरतो, हेसुद्धा तिने स्पष्ट केलं. खासगी आयुष्यात आलेल्या एका वादळाकडेही तिने मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहात स्वत:वरच लक्ष केंद्रित केलं आणि त्यातून बऱ्याच नव्या गोष्टी साध्य केल्या. 

'वोग' मासिकाच्या नव्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर झळकणाऱी कतरिना सध्या भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यासोबतच ती येत्या काळात अभिनेता शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत 'झिरो' चित्रपटातही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.