...असं झालेलं 'धकधक करने लगा'चं चित्रीकरण

अभिनय, नृत्यकौशल्य आणि स्मितहास्याने तिने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला 

Updated: May 22, 2020, 02:09 PM IST
...असं झालेलं 'धकधक करने लगा'चं चित्रीकरण
संग्रहित छायाचित्र

मुंबई : काही कलाकारांना या कलाविश्वात फार कमी वेळातच अशी काही ओळख मिळते की, पुढच्या कित्येक वर्षांसाठी किंबहुना आयुष्यभरासाठी हीच त्यांनी ओळख होऊन जाते. अशा कलाकारांमधीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचं. 

हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनय, नृत्यकौशल्य आणि स्मितहास्याने अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मराठमोळ्या माधुरीची आणखी एक ओळख. ती म्हणजे 'धकधक गर्ल'. अनेक कार्यक्रमांमध्ये, चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असताना किंवा इतर काही कारणांनी तिला याच नावाने संबोधलं जातं. पण, तुम्हाला माहितीये का ज्या गाण्याने माधुरीला ही ओळख दिली, तेच आज साकारण्यात आलं नसतं तर तिलाही ही ओळख मिळाली नसती. 

खुद्द माधुरीनेच एका मुलाखतीदरम्यान, याविषयीची माहिती दिली होती. धकधक करने लगा हे गाणं एकतर चित्रपटामध्ये समाविष्ट करण्यात आलं त्यावेळी लिप सिंक होत नसल्यामुळं ते अतिशय शेवटच्या क्षणी चित्रीत करण्यात आलं होतं. त्यातही माधुरी एका दुसऱ्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती त्यामुळं रात्रीच्या वेळी ती या गाण्याच्या चित्रीकरणाला वेळ देत होती. 

 

वाचा : '...तर मराठी चित्रपटांनाच याचा फायदा होईल' 

 

फक्त माधुरीच नव्हे, तर अनिल कपूरसुद्धा त्यावेळी आणखी एका प्रोजेक्टमध्ये व्यक्त होता. त्यामुळे या दोन्ही कलाकारांनी रात्रीच्याच वेळी चित्रीकरण करत तीन ते चार दिवसांमध्ये गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. कामाचा व्याप असताना त्यातही वेळ काढत अगदी शेवटच्या टप्प्यात चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात माधुरी झळकली आणि बस्स पाहता पाहचा तिने प्रेक्षकांच्या काळजात अशी काही धकधक केली की हीच तिची ओळख ठरली.