'...तर मराठी चित्रपटांनाच याचा फायदा होईल'

कलाविश्वापुढे असणाऱ्या नव्या पर्यायाविषयी सोनाली म्हणते.... 

Updated: May 22, 2020, 04:41 PM IST
'...तर मराठी चित्रपटांनाच याचा फायदा होईल'  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना विषाणू आणि त्याचा झपाट्यानं होणारा प्रादुर्भाव ही भारतापुढे उभी राहिलेली एक मोठी समस्या. साधारण गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ देशापुढे असणाऱ्या या आव्हानानं साऱ्यांच्या मनात प्रश्नांचा काहूर माजवला आहे. दैनंदिन जीवनासह अनेक क्षेत्रांतील कामकाजही ठप्प झालं आहे. 

ठप्प झालेल्या या कामांना आता कुठं गती देण्याचे पर्याय शोधले जात आहेत. कलाविश्वाच्या बाबतीतही हेच चित्र. सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा, चित्रीकरणाच्या तारखा, कलाकार, तांत्रिक कामं करणारी मंडळी अशा प्रत्येकालाच आता परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आस आहे. ज्यामध्ये ओटीटी अर्थात ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मराठी सिनेमे प्रदर्शित करण्यात यावेत असा सूर अनेकजण आळवत आहेत. याचविषयी आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं 'झी २४तास'च्या लाईव्ह चॅटमध्ये आपलं मत मांडलं. 

'सिनेमे ऑनलाईन रिलिज होणं फार आवश्यक आहे. कारण, एका शुक्रवारी आपले पाच ते सहा सिनेमे रिलीज होत होते, जे एकमेकांनाच मारक ठरत होते. त्यामुळे ते ऑनलाईन रिलीज झाल्यास हा धोका नक्कीच कमी होईल', असं ती म्हणाली.

'अनेक चित्रपट हे छोट्या जीवाचे असतात. त्यांची कथा फार सुरेख असते. त्याला विविध ठिकाणी पुरस्कारही मिळालेले असतात. पण, अशा चित्रपटांना रिलीज चांगला मिळाला नाही, असं आपण अनेकदा ऐकतो. याच्यासाठी सिनेमागृहांचे मालक, वितरक यांना आपण दोष देत असतो. पण, सध्याची एकंदर परिस्थिती पाहता दोषारोपांसाठी कोणालातरी बळी ठरवण्यापेक्षा या ऑनलाईन माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करुन घेत जर सिनेमे ऑनलाईन दाखवले गेले तर गर्दीचा प्रश्न सुटेल एका वेळी चित्रपच रिलीज होण्याची चित्रपट गृहांतील गर्दीही कमी होईल आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा अपेक्षित असा प्रेक्षक मिळेल', हा विचार तिनं मांडला.

 

सोनालीनं यावेळी स्वत:चा अनुभवही शेअर केला. 'माझेही काही असे सिनेमे आहेत जे त्या- त्या वेळेला गाजले होते, त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते, पण, ते चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले नव्हते', असं म्हणत ओटीटी माध्यमांची उपलब्धता किती फायद्याची आहे हे तिनं सांगितलं. एक प्रकारच्या त्रासातून निर्माते, कलाकार, सर्व तंत्रज्ञ आणि अर्थात प्रेक्षकांचीही मोकळीक होईल. कारण, कारण प्रेक्षकांनाही हे सिनेमे उपलब्ध असतील. अर्थात त्या त्या माध्यमासाठी त्यांना पैसे मोजावे लागतील पण, सर्वांचीच चांगल्या पद्धतीने सोय झालेली असेल. असं केल्यास अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रपट हे माध्यम प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल, या वाक्यावर तिनं जोर दिला.