global scam artist म्हणणाऱ्यांना प्रियांकाचं सडेतोड उत्तर

'देसी गर्ल' आणि तिच्या पतीवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण... 

Updated: Dec 10, 2018, 01:37 PM IST
global scam artist म्हणणाऱ्यांना प्रियांकाचं सडेतोड उत्तर

मुंबई : 'क्वांटिको गर्ल', 'देसी गर्ल', 'ग्लोबल आयकॉन' अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधली. भारतातच जोधपूर येथील आलिशान उमेदभवन पॅलेसमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला. 'देसी गर्ल' आणि तिच्या पतीवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. 

एकिकडून या नवविवाहित जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे मात्र एका वेगळ्याच वादाने डोकं वर काढलं होतं. 'द कट' या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखातून प्रियांकावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात आल्या होत्या. इतकच नव्हे तर तिचा उल्लेख global scam artist म्हणून करत निकच्या मनाविरुद्ध त्याला हे लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. 

प्रियांकाविषयीचा हा लेख प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेकांनीच त्याविषयी संताप व्यक्त केला. जोनास कुटुंबीयांनीही लेख लिहिणाऱ्या लेखिकेला तिखट शब्दांमध्ये सुनावलं ज्यानंतर तो लेख वेबसाईटवरुन मागे घेण्यात आला. 

लग्नसोहळ्याविषयी झालेल्या या सर्व वादाविषयी प्रियांकाला ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, 'मी या प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. कारण, हे सारंकाही माझ्या वर्तुळात येतच नाही. सध्याच्या क्षणाला मी अतिशय आनंददायी ठिकाणी आहे, त्यामुळे या अशा चर्चांचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही', असं ती म्हणाली. 

प्रियांकाच्या आईनेही दिली प्रतिक्रिया... 

'देसी गर्ल'पाठोपाठ तिची आई, मधू चोप्रा यांनीही लेख लिहिणाऱ्यांचा तिखट शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. 'ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याच्याशीच माझ्या मुलीने लग्न केल्याचा मला फार आनंद होत आहे. आता काही गाढव, या साऱ्याविषयी त्यांना वाटेल तसं काहीही वेडंवाकडं बोलत आहेत. पण, त्यांच्या बोलण्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही', अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली.