मुंबई : करिअरच्या वाटांवर निघालेल्या प्रत्येकाला प्रश्न केल्यावर काही वर्षांपूर्वी अपेक्षित उत्तरं मिळायची. पण, याच वाटा दूर सारत रॅपर होण्याचं स्वप्न पाहिलं लोकप्रिय रॅपर, गायक बादशाह याने. त्याच्या या स्वप्नावर कुटुंबीयांचा फारसा विश्वास नव्हता. पण, या मार्गानेही अर्थार्जनाची संधी आहे, हे लक्षात येताच कुठे त्याच्या या कलेविषयी कुटुंबीयांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं होतं.
बादशाह ज्या कलेमुळे नावारुपास आला, त्याच कलेमुळे प्रेयसी त्याला सोडून गेली होती. 'पिंकव्हिला'शी संवाद साधताना मुलाखतीदरम्यान त्याने ही बाब सांगितली. 'मी त्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. अवघ्या तीन वर्षांचा असल्यापासून मी तिच्या प्रेमात होतो. तिनेही मला चांगली साथ दिली होती'', असं बादशाहने सांगितलं. नात्यामध्ये प्रेयसीने साथ दिली असली तरीही, करिअरसाठी त्याने निवडलेली रॅपर होण्याची वाट मात्र तिला खटकली आणि तिने या नात्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
आपल्या करिअरविषयी घरातल्या मंडळींचं चांगलं मत नाही, असं सांगत आपल्याया यातून पैसे मिळतात हे त्यांना कळल्याचंही त्याने सांगिलतं. यासाठी त्याने एका प्रसंगाची आठवणही रंगवली. 'एके दिवशी एक महागडी कार मी घरापाशी उभी केली. ही कार कोणाची? असा प्रश्न मला वडिलांनी केला. ही कार माझी आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर ही तुझ्याकडे ही कशी आली असा प्रश्न त्यांनी केला. गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाल्याचं मी त्यांना जेव्हा सांगितलं, तेव्हाच या कलेतून पैसेही मिळतात का.... अशी त्यांची प्रतिक्रिया होती', असं सांगत बादशाहने हा प्रसंग सर्वांपुढे ठेवला.