मुंबई : वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी एक धुन तयार करत संगीत क्षेत्रात किमया करणाऱ्या एका जादूगाराचा उल्लेख झाला की वातावरणातही एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. हिंदी चित्रपट संगीतांमध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारं हे व्यक्तिमत्वं म्हणजे संगीतकार आर.डी. बर्मन यांचं.
आर. डीं.च्या जयंतीनिमित्त आज कलाविश्व आणि चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. आर.डी. बर्मन हे प्रत्येकासाठी एक वेगळं समीकरण. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याची धुन संगीतकार आणि आर.डी. बर्मन यांचे वजील एस.डी.बर्मन यांनी १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फंटूश' या चित्रपटात वापरली.
संगीत क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या पंचम म्हणजेच आर.डी. बर्मन यांचा एक अमेरिकन रॉक अल्बमही होता. 'पंतेरा' असं त्याचं नाव. लॅटिन अमेरिकनसह जॅज, फंक असं विविध प्रकारचं संगीत या अल्बममध्ये होतं. संगीत निर्माण करण्यासाठी अमुक एका वाद्याचा वापर करावा या समजुतीला पंचम दांनी शह दिला होता.
'यादों की बारात' या चित्रपटातील 'चुरा लिया है तुमने....' या गाण्याच्या सुरुवातीलाच एक वेगळाच आवाज कानांवर येतो. ग्लास आणि चमचा वापरत त्यातून हे संगीत निर्माण केलं होतं. तर, रेखा यांच्यावर चित्रीत 'धीरे धीरे जरा जरा' या गाण्यात रेखा यांच्या कमरेवर असणाऱ्या आभूषणांच्या आवाजासाठी त्यांनी चक्क चाव्यांचा वापर केला होता. विविध कल्पना लढवत आणि श्रोत्यांच्या पसंतीला प्राधान्य देत पंचम यांनी कायमच अद्वितीय संगीत दिग्दर्शन केल्याचं पाहायला मिळालं.
पंचम दा आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या संगीताच्या माध्यमातून मात्र ते कायमच ते प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत हे खरं.