मुंबई : 'तुझ माझं ब्रेक अप' फेम अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली आहे. सतीश पाटील असे ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी केतकीने अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधीत प्रकरणाबाबतीत निवेदनही सादर करण्यात आले होते.
दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यावरून मुख्यमंत्र्यांनी अशा खोट्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्यासाठी, गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने मराठीतून नव्हे, तर हिंदीमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने हिंदी ही आपली 'राष्ट्रभाषा' आहे असे म्हटले होते. मात्र, केतकीच्या या व्हिडिओवर ट्रोलर्सकडून शेलक्या शब्दांत टीकेची झोड उठवण्यात आली होती.