मुंबई : अभिनेता रणवीर सिंग लवकरच 'गली बॉय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये आता भर पडली आहे ती म्हणजे एका नव्या गाण्याची. रॅपसाँग प्रकारातील 'आजादी' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, कल्की कोचली, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यावर ते चित्रीत करण्यात आलं आहे.
नावाप्रमाणेच या गाण्यातून बऱ्याच गोष्टींबाबत स्वातंत्र्याची मागणी करण्यात येणारी एक अशी पिढी किंवा अशी पात्र दिसत आहेत जी पाहता सध्याची तरुणाई याच्याशी लगेचच जोडली जात आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या एका अशा वर्गाला या चित्रपटातून आणि या गाण्यतून प्रकाशझोतात आणलं आहे ज्यांना परिस्थितीमुळे बऱ्याच चांगल्या संधींना मुकावं लागतं.
'आजादी' हम लेके रहेंगे, आजादी.... तुम कुछ भी करलो आजादी' ही ओळ ऐकताच ती यापूर्वी कुठेतरी ऐकल्याचा भास होतो. तो अपेक्षित आहे, कारण ,२०१६ मध्ये जेएनयूमध्ये झालेल्या आंदोलनात कन्हैय्या कुमारच्या भाषणातून ती बरीच गाजली होती. तीच ओळ गाण्यात मोठ्या कौशल्याने वापरण्यात आली आहे. 'बोलो आजादी...', असे बोल असणाऱ्या या गाण्यात रणवीरचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. तर, कल्कीचा दिलखुलास अंदाजही तितकाच लक्षवेधी ठरत आहे. एक वेगळं शहर आणि त्याच शहरात अनेक स्वप्न उराशी बाळगून घुसमटणारी तरुणाईसुद्धा गाण्याच पाहायला मिळत आहे.
आजादी या गाण्यातून भ्रष्ट यंत्रणांवर प्रश्नचिन्हं उपस्थित करते. त्यामुळे हे गाणं म्हणजे प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर सोडण्यात आलेलं टीकास्त्र आहे, असं गाण्याचा संगीतकार डब शर्मा याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं. 'गली बॉय' या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट सध्या कलाविश्वात आणि चाहत्यांच्या वर्तुळात बरीच चर्चेत येत आहे. त्यामुळे आता हा 'गली बॉय' कमाईच्या बाबतीत यशस्वी ठरत बॉक्स ऑफिसवर राज्य करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.