'या' एकाच चित्रपटातून खिलाडी कुमार घडवणार ६०० वर्षांचा प्रवास

जाणून घ्या या चित्रपटाविषयी   

Updated: Sep 25, 2019, 12:19 PM IST
'या' एकाच चित्रपटातून खिलाडी कुमार घडवणार ६०० वर्षांचा प्रवास
चित्रपटातून पाहायला मिळणार त्याचा कधीही न पाहिलेला अंदाज

मुंबई : सर्व धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य देत तितक्याच आव्हानात्मक आणि प्रेक्षकांना भावतील अशा भूमिका साकारण्याकडे अभिनेता अक्षय कुमारचा कल असतो. प्रत्येक भूमिकेतून त्याने वेगळेपण जपलेलं असतं. असा हा अभिनेता आता सज्ज झाला आहे, प्रेक्षकांना एक अशी भेट देण्यासाठी ज्या माध्यमातून त्यांना सहाशे वर्षांचा काळ अनुभवता येणार आहे. 

मुख्य म्हणजे या चित्रपटातील त्याची भूमिकासुद्धा तितकीच वेगळी असणार आहे. खिलाडी कुमारने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा एक टीझरही प्रसिद्ध केला. या चित्रपटाचं नाव आहे, 'हाऊसफुल्ल ४'.

'हाऊसफुल्ल' या चित्रपटाच्या मालिकेतील हा चौथा चित्रपट. ज्यामध्ये अक्षय १४१९ मधील 'राजकुमार बाला'च्या रुपात झळकणार आहे. तर, २०१९ मधील 'हॅरी'ची भूमिकाही तोच साकारत आहे. तेव्हा आता या दोन्ही भूमिकांचा भार पेलत विनोदाच्या जोडीने प्रेक्षकांना निखळ आनंद देण्याचा प्रयत्नात तो यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अक्षयने या चित्रपचटातील त्याच्या भूमिकेवरुन पडदा उचलला आहे. 'बाला शैतान का साला', असं अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तो राजेशाही थाटात दिसत आहे. कोणा एका गोष्टीवर रोखलेली नजर, नेम धरण्यासाठी हाती घेतलेलं धनुष्य अशी एकंदरच त्याची झलक पाहायला मिळत आहे. 

लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये खिलाडी कुमारव्यतिरिक्त इतरही काही कलाकार झळकणार आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनन, रितेश देशमुख, कृती खरबंदा, बॉबी देओल, पूजा गर्ग आणि इतरही काही सहकलाकारांचा समावेश आहे.