'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला

प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच्या दिवसापासून... 

Updated: Jan 29, 2020, 02:51 PM IST
'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता अजय देवगन याने एक अद्वितीय अशी गाथा प्रेक्षकांसमोर ठेवली. ऐतिहासिक प्रसंग, शिवकालीन कालखंड आणि स्वराज्य विस्तारण्यासाठीच्या संघर्षातील काही घडामोडींचा संदर्भ घेत ओम राऊतच्या दिग्दर्शनात साकारण्यात आला, चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'. 

अजय देवगन याने रुपेरी पडद्यावर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा साकारलेल्या या चित्रपटात काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे हे आणि इतरही बरेच कलाकार झळकले. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या परिने या चित्रपटात आपलं योगदान दिलं आणि पाहता पाहता याचा निकालही हाती आला. 

प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणाऱ्या 'तान्हाजी'चा गल्ला दिवसागणिक वाढतच राहिला. पन्नास, शंभर , दीडशे, दोनशे कोटींचा व्यवसाय करता करता अखेर आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने या चित्रपटाने गगनाला भिडणाऱ्या यशालाच गवसणी घातली आहे. 

'तान्हाजी'च्या कमाईच्या आकड्यांनी ३०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. २०२० मध्ये दमदार कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरत आहे. दरम्यान, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत या चित्रपटाची भारतातील कमाई सर्वांसमोर आणली आहे. ज्यामध्ये त्यांनी सातत्याने वाढणारे आकडे अधोरेखित केले आहेत. 

अजय देवगन, काजोल, सैफ अली खान स्टारर या चित्रपटाची घोडदौड पाहता आता येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी तान्हाजीने एका अर्थी कमाईच्या आकड्यांचं आव्हानच पुढे ठेवलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.