....त्याच्या येण्याने कलाविश्वात येणार 'तुफान'

दमदार भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं? 

Updated: Sep 30, 2019, 02:57 PM IST
....त्याच्या येण्याने कलाविश्वात येणार 'तुफान'
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : विविध भूमिकांना न्याय देत अफलातून कलाकृती साकारल्या जाणाऱ्य़ा हिंदी कलाविश्वात आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडत आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला आहे. 'तुफान', असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी घेतली आहे. 

तरुणाईच्या गळ्यातील ताईत आणि यापूर्वीही राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव असणारा फरहान अख्तर 'तुफान'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. खुद्द फरहाननेच सोशल मीडियावर त्याच्या या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो पोस्ट केला. 

'तुफान'ची पहिलीवहिली झलक पाहताच त्यावर चाहते आणि कलाकार मंडळींच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या फोटोमध्ये फरहानचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही. पण, तरीही त्याची एकंदर देहयष्टी पाहता या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली असल्याचं स्पष्ट होत आहे. या फोटोमध्ये तो एका बॉक्सिंग रिंगमध्ये दिसत आहे.

मुख्य म्हणजे फरहानचा हा आगामी चित्रपट बायोपिक नसून, एका काल्पनिक कथानकावर आधारित चित्रपट असणार आहे. तेव्हा आता दिग्दर्शकाच्या कलाविश्वातून नेमकी कोणती कथा साकारली जाणार याकडे साऱ्याचं लक्ष आहे. 

 
 
 
 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

'तुफान उठेगा', असं कॅप्शन देत फरहानने चित्रपटाची पहिली झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे. ज्यामध्ये त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. फरहानसोबतच या चित्रपटामध्ये परेश रावल आणि मृणाल ठाकूर हे कलाकारही झळकणार आहेत. तेव्हा आता राकेश ओमप्रकारश मेहरा आणि फरहान यांची ही जोडगोळी रुपेरी पडदा गाजवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.