KK Death News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक केके (KK) उर्फ कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) यांचं काल निधन झालं. 31 मे रोजी कोलकाता इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. के.के कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. कॉन्सर्टदरम्यान त्याची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
केके यांचे कोलकात्यात एकामागून एक दोन परफॉर्मन्स झाले. ते नझरूल मंचच्या सभागृहात कार्यक्रम करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. सतत वाढणारी गर्दी, एसी न चालणं आणि घुसमट झाल्याने केके यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, रुग्णालयात नेत असताना त्यांची प्रकृती खालावली आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
आता केकेच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच दिग्गज अभिनेते ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी (Nandita Puri) यांनी कोलकाता इथं होत असलेल्या लाईव्ह परफॉर्मन्सवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नंदिता यांनी उपस्थित केले प्रश्न
ओम पुरी यांच्या माजी पत्नी नंदिता यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान शहरातील सुविधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत नंदिताने लिहिलंय 'बंगालची लाज वाटते. कोलकाताने केकेची हत्या केली आणि तिथलं सरकार त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे. नझरुल स्टेजवरच योग्य ती खबरदारी घेतली जात नव्हती. अडीच हजार लोकांची क्षमता असलेल्या सभागृहात सात हजार लोक कसे आले. एसी बंद होता. गायकाने चार वेळा तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. औषधांची सोय नव्हती. प्रथमोपचार नव्हता. संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत बॉलीवूडने कोलकात्यातील कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा' असं नंदिता पुरी यानी म्हटलं आहे.
केके यांच्या पार्थिवाचं 1 जून रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर कोलकात्यात मृतदेहाला तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. केके यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात येणार आहे. केकेंचं कुटुंब संध्याकाळच्या सुमारत फ्लाइटमधून सिंगरच्या पार्थिवासह मुंबईला रवाना झाले आहेत. हे विमान सकाळी 7.45 च्या सुमारास मुंबईला पोहोचेल.
केके यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केके यांच्या मुंबईतील घरी त्यांचे मित्र आणि इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांनी गर्दी केली आहे.
केके यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. संगीतकार आणि गायक एआर रहमान यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ए आर रेहमान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय 'प्रिय केके… काय घाई होती मित्रा. तुझ्यासारख्या प्रतिभावान गायक आणि कलाकारांनी आयुष्य अधिक सुसह्य केलं'